मिलिंद एकबोटे-राज ठाकरे यांची भेट, भेटीनंतर मिलिंद एकबोटे म्हणतात…

धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली (Milind Ekbote meet Raj Thackeray).

मिलिंद एकबोटे-राज ठाकरे यांची भेट, भेटीनंतर मिलिंद एकबोटे म्हणतात...

मुंबई : धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली (Milind Ekbote meet Raj Thackeray). राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी जाऊन एकबोटे यांनी त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये दहा ते पंधरा मिनिटे चर्चा झाली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर एकबोटेंनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेत त्यांनी राज ठाकरे यांनी घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेचं स्वागत केलं. “हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे”, असंदेखील एकबोटे यावेळी म्हणाले (Milind Ekbote meet Raj Thackeray).

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त पुण्याच्या वढू बुद्रूक येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मिलिंद एकबोटे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. हा कार्यक्रम 24 मार्चला आयोजित करण्यात आला आहे.

मिलिंद एकबोटे नेमकं काय म्हणाले?

“धर्मवीर संभाजी महाराजांचं वढू बुद्रूक  हे समाधीस्थान आहे. त्याठिकाणी 24 मार्चला संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज ठाकरेंनी संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी यावं आणि उपस्थित राहणाऱ्या सर्व शंभू भक्तांना मार्गदर्शन करावं, अशी विनंती करण्यासाठी मी आलो होतो”, असं मिलिंद एकबोटे यांनी स्पष्ट केलं.

कोण आहेत मिलिंद एकबोटे?

मिलिंद एकबोटे यांचं नाव कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर प्रचंड चर्चेत आलं होतं. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यावर पुण्यात दंगल भडकावणे आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकबोटे यांच्यावर कोरेगाव भीमा हिंसाचाराअगोदरही दंगल भडकवणे, अतिक्रमण करणे असे तब्बल 12 गुन्हे दाखल आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI