शिवसेना नेत्याने शिवबंधन सोडले, काँग्रेसचा ‘हात’ हाती

| Updated on: Jan 04, 2021 | 7:46 AM

मीरा भाईंदरमधील शिवसेना नेते मेंनेंजीस सातन यांनी शेकडो समर्थकांसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला Mira Bhainder Shivsena Congress

शिवसेना नेत्याने शिवबंधन सोडले, काँग्रेसचा हात हाती
Follow us on

मीरा भाईंदर : महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये फोडाफोडीचा प्रकार सुरुच असल्याचं चित्र आहे. मीरा भाईंदरमधील शिवसेना नेत्याने शिवबंधन सोडत काँग्रेसचा ‘हात’ हाती धरला. शिवसेना नेते मेंनेंजीस सातन यांनी शेकडो समर्थकांसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Mira Bhainder Shivsena Leader joins Congress)

मीरा भाईंदरच्या काशीमिरा हायवे पट्ट्यातील शिवसेनेचे नेते मेंनेंजीस सातन यांनी शिवसेनेला राम राम ठोकला. महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी सातन यांच्या शेकडो समर्थकांनीही काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.

मीरा रोडच्या नया नगर काँग्रेस कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याआधीही शिवसेना आणि काँग्रेसमधील नेत्यांनी एकमेकांच्या पक्षात उड्या मारल्या आहेत. परंतु महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर अशा पक्षांतराकडे राजकीय वर्तुळात गांभीर्याने पाहिले जात आहे. विशेषतः शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये पारनेरच्या नगरसेवकांवरुन मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं.

शिवसेना-काँग्रेसमध्ये तणातणी

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची 115 मतं भाजप उमेदवार अमरिश भाई पटेल यांच्या पारड्यात पडली. त्यानंतर काँग्रेस-शिवसेनेत तणातणी होताना दिसली होती. शिवसेनेने काँग्रेसशी प्रामाणिकपणा दाखवला, काँग्रेसचीच मतं भाजपला गेली, असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी केला होता. धुळे नंदुरबार (Dhule Nandurbar) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अमरिश पटेल (BJP Leader Amrish Patel) यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. (Mira Bhainder Shivsena Leader joins Congress)

औरंगाबादेत महाविकास आघाडीचा प्रयोग मोडीत

याआधी, औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड ग्रामपंचायतीमध्येही महाविकास आघाडीचा प्रयोग मोडीत निघाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपचा हात धरला आहे. शिवसेना नेते आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे यांच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या तीन पक्षांनी आघाडी केली.

विशेष म्हणजे, भुमरे यांनी या तिन्ही पक्षांच्या आघाडीला नमवत तीन जागा बिनविरोध काढल्या. तसेच त्यांनी राहिलेल्या 14 जागा जिंकून येथील ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी मोर्चेबांधणी केल्याचं सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या :

शिवसेना काँग्रेसशी प्रामाणिक, काँग्रेसचीच मतं भाजपला, अमरिश पटेलांच्या विजयानंतर सेना नेत्याचा दावा

संदीपान भुमरेंची कमाल, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप एकत्र; तरीही शिवसेनेचे तिघे बिनविरोध

(Mira Bhainder Shivsena Leader joins Congress)