आमदाराच्या हत्येचा कट उघड, तपासासाठी एसआयटीची घोषणा, गृह राज्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या संभाव्य हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आमदाराच्या हत्येचा कट उघड, तपासासाठी एसआयटीची घोषणा, गृह राज्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये
yogesh kadam
| Updated on: Jul 04, 2025 | 11:21 PM

पिंपरी चिंचवडमध्ये एका भयानक कटाचा पर्दाफाश झाला आहे, मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या संभाव्य हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात आमदार शेळके यांनी महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या या सूचनेला उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सात सराईत गुन्हेगार, नऊ पिस्तूल, 42 जिवंत काडतुसे…

26 जुलै 2023 रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दरोडाविरोधी पथकाने गुप्त माहितीनुसार तळेगाव दाभाडे परिसरात मोठी कारवाई केली होती. यात सुरुवातीला दोन गुन्हेगार पकडण्यात आले. त्यानंतर तपास पुढे गेल्यानंतर एकूण सात सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. या सर्वांकडून 9 पिस्तूल, 42 जिवंत काडतुसे, कोयते अशा प्राणघातक शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला. या सर्व गुन्हेगारांवर आधीच खून, खुनाचा प्रयत्न, जाळपोळ, खंडणी, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे, लूट, तोडफोड असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सुनील शेळके यांची हत्या करण्याचाच उद्देश

या प्रकरणाच्या तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या गुन्हेगारांकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांचा वापर आमदार सुनील शेळके यांची हत्या करण्यासाठीच होणार होता, असा खुलासा जबाबातून समोर आला आहे. हे आरोपी मध्यप्रदेश, जालना, वडगाव, काळेवाडी परिसरातले असून आमदार शेळके यांचे त्यांच्याशी कोणतेही वैयक्तिक वैर नव्हते. त्यामुळे या गुन्हेगारांच्या पाठीमागे कोणी शक्तिशाली सूत्रधार असल्याचा संशय शेळके यांनी विधानसभेत व्यक्त केला आहे.

लाखोंची गुंतवणूक कोण करतंय? शेळके यांचा सवाल

शेळके यांनी असे म्हटले की, ‘ही टोळी गरीब आणि सामान्य कुटुंबातील असूनही त्यांच्याकडे नऊ पिस्तूल, कोयते खरेदी करण्यासाठी लाखोंचा खर्च झाला. एवढेच नव्हे तर, ज्या नामांकित वकिलांनी आरोपींची बाजू घेतली त्यांच्या फीही लाखोंच्या घरात होती. मग या सगळ्यांमागे “हे पैसे कोण पुरवतंय?”, आणि “माझ्या हत्या कटामागचा सूत्रधार कोण?”, असा थेट सवाल शेळके यांनी उपस्थित केला.

तडीपार असूनही जिल्ह्यात वावर

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तरात सांगितले की, ‘पकडलेले गुन्हेगार दीड वर्ष तुरुंगात होते. नंतर जामीन मिळाल्यावर त्यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले.’ मात्र, तडीपार असूनही हे गुन्हेगार पुणे जिल्ह्यात लपून येतात, असा आरोपही आमदार शेळके यांनी केला.

सखोल तपास होणार

या गंभीर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन योगेश कदम यांनी विधानसभेत उत्तर देताना SIT नेमण्याचा निर्णय पुढील सात दिवसांत घेण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मात्र प्रकरणाचे गांभीर्य पाहून लगेचच SIT ची स्थापन करण्यात आली आहे. या सात गुन्हेगारांपैकी काहींना शस्त्र पुरवणारा देवराज नावाचा मध्यप्रदेशातील व्यक्ती असून त्याची माहितीही संबंधित राज्य सरकारला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणात कोण पैसे पुरवतं?, मूळ सूत्रधार कोण?, याचा सखोल छडा लावण्याचे आश्वासन गृह राज्यमंत्री कदम यांनी दिले आहे.