अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार, पत्रकार परिषदेत मोठे खुलासे करण्याची शक्यता

| Updated on: Nov 30, 2020 | 10:20 AM

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकरचं नाव देण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर उर्मिला उद्या शिवबंधन हाती बांधणार असल्याचं नक्की झालं आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार, पत्रकार परिषदेत मोठे खुलासे करण्याची शक्यता
पक्षांतर्गत गटबाजीमुळे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर आता शिवसेनेने त्यांना विधान परिषदेची ऑफर दिल्याने उर्मिला यांची नवी राजकीय इनिंग सुरू होणार आहे.
Follow us on

मुंबई: काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळतेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर जात उर्मिला मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं कळतंय. मात्र भेटीची वेळ अद्याप ठरलेली नाही. तर उद्या दुपारी 4 वाजता उर्मिला पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत उर्मिला मोठे खुलासे करण्याची शक्यता आहे.(Actress Urmila Matondkar will join Shiv Sena tomorrow)

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करत उर्मिला मातोंडकर हिने उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं होतं. पण लोकसभा निवडणुकीत उर्मिलाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वादावर तोंडसुख घेत उर्मिलाने अवघ्या सहा महिन्यात पक्षाला रामराम ठोकला होता.

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकरचं नाव देण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर उर्मिला उद्या शिवबंधन हाती बांधणार असल्याचं नक्की झालं आहे.

मुख्यमंत्री आणि उर्मिला यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली होती. अभिनेत्री कंगना रानौतने बॉलीवूड कनेक्शनच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केले असताना उर्मिला मातोंडकर यांनी सर्वप्रथम तिच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. याशिवाय, उर्मिला मातोंडकर यांचे वक्तृत्त्व, राजकीय समज आणि राज्यपालनियुक्त सदस्यपदासाठीचे निकष पूर्ण करण्याची क्षमता लक्षात घेऊन शिवसेना त्यांना विधानपरिषेदवर पाठवल्याचं म्हटलं आहे.

काँग्रेसवर आगपाखड करुन सोडचिठ्ठी

मुंबई काँग्रेसच्या भल्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अंतर्गत राजकारण सोडवण्यासाठी काँग्रेसने माझ्या प्रतिमेचा गैरवापर करुन घेतला, असा दावा करत उर्मिला मातोंडकर यांनी अवघ्या सहा महिन्यात पक्षाला सो़डचिठ्ठी दिली होती. 45 वर्षीय उर्मिला मातोंडकर यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. उर्मिला यांचे ‘रंगीला’, ‘प्यार तुने क्या किया’, ‘भूत’, ‘कौन’ यासारखे असंख्य चित्रपट गाजले आहेत. उर्मिला यांच्या डान्सचेही चाहते आहेत. त्यांनी काही रिअ‍ॅलिटी शोंचं परीक्षणही केलं आहे.

काँग्रेसची विधान परिषदेची ऑफर नाकारली

आम्ही उर्मिला मातोंडकर यांना संपर्क साधून विधान परिषदेवर जाण्याची ऑफर दिली होती. पण त्यांनी नकार दिला. राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचं त्या म्हणाल्या. आता जर त्यांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली असेल तर त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे, असं मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेसची विधान परिषदेची ऑफर नाकारली; वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट

उर्मिला मातोंडकरांकडून शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार; सूत्रांची माहिती

विधानपरिषद : उर्मिला आणि नितीन बानुगडे विधानपरिषदेवर, शिवसेनेची चार नावं ठरली !

Actress Urmila Matondkar will join Shiv Sena tomorrow