Mumbai MLC Election : मुंबई विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार, सुरेश कोपरकरांचा उमेदवारी अर्ज मागे

| Updated on: Nov 25, 2021 | 5:43 PM

सुरेश कोपरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. कोपरकर यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर कोपरकरांना काँग्रेसनं पाठिंबा दिला होता. मात्र, आता कोपरकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता भाजप उमेदवार राजहंस सिंह आणि शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे यांचा मार्ग मोकळा झालाय.

Mumbai MLC Election : मुंबई विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार, सुरेश कोपरकरांचा उमेदवारी अर्ज मागे
मुंबई विधान परिषद निवडणुकीतून सुरेश कोपरकरांची माघार
Follow us on

मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या 6 जागा बिनविरोध होण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीसह विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडूनही प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी मुंबईतील विधान परिषदेच्या दोन जागा आता बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झालाय. कारण सुरेश कोपरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. कोपरकर यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर कोपरकरांना काँग्रेसनं पाठिंबा दिला होता. मात्र, आता कोपरकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता भाजप उमेदवार राजहंस सिंह आणि शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे यांचा मार्ग मोकळा झालाय. (Mumbai Legislative Council elections will be unopposed, Suresh Koparkar withdraws from the elections)

काँग्रेसच्या सुरेश कोपरकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक तिरंगी होणार होती. कोपरकर यांच्या उमेदवारीमुळे सुनील शिंदे यांना दगाफटका होणार का? याबाबतही महापालिकेत चर्चा रंगली होती. मात्र, आता कोपरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी दूर झाली आहे.

शिवसेनेकडून सुनील शिंदे मैदानात

मुंबई महानगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार सुनील शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. सुनील शिंदे हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. ते मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवकही आहेत. शिवाय बेस्ट समितीचे ते अध्यक्षही होते. पुढील वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने शिवसेनेला पालिका निवडणुकीत बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपकडून राजहंस सिंहांना संधी

भाजपने माजी आमदार राजहंस सिंह यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. राजहंस सिंह हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. ते नगरसेवक ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. भाजपमध्ये आल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते अडगळीत गेले होते. मात्र, भाजपने आता त्यांना उमेदवारी देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यास सुरुवात केली आहे. राजहंस सिंह यांच्या उमेदवारीकडे राजकीय अंगानेही पाहिले जात आहे. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय व्होटबँक आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपने राजहंस सिंह यांना उमेदवारी दिल्याचं सांगितलं जात आहे.

आकडा काय सांगतो?

मुंबई महानगरपालिकेचे 227 निर्वाचित नगरसेवक आणि 5 नामनिर्देशित नगरसेवक असे 232 नगरसेवक आहेत. त्यापैकी तीन जागा रिक्त असल्याने विद्यमान नगरसेवकांची संख्या 229 एवढी आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत जिंकण्यासाठी उमेदवाराला किमान 77 मतांचा कोटा आवश्यक आहे. शिवसेनेकडे सध्या 99 नगरसेवक मतदार आहेत. तर भाजपकडे 83 नगरसेवक मतदार आहेत. त्याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य मिळून 47 नगरसेवक मतदार आहेत. त्यामुळे राजहंस सिंह आणि सुनील शिंदे यांचा विजय सोपा मानला जात आहे. त्यात जर काँग्रेसने तिसरा उमेदवार दिल्यास ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. तिसरा उमेदवार मैदानात उतरल्यास मतांची फोडाफोडी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे.

इतर बातम्या :

पहिले ते बारावी सरसकट सर्व वर्ग सुरु होणार, नेमके कोणते नियम पाळले जाणार, काय काळजी घेतली जाणार?

‘साखरेला चांगले दिवस, ऊसाला 3700 रुपये भाव द्या’, राजू शेट्टींची नाशिकमधून मागणी; एसटी कर्मचाऱ्यांनाही महत्वाचा सल्ला

Mumbai Legislative Council elections will be unopposed, Suresh Koparkar withdraws from the elections