आदित्य ठाकरे यांच्या हैदराबाद दौऱ्यावरून तर्कवितर्क, बीआरएस सोबत नवी राजकीय चाल की आणखी काही? राजकीय चर्चा काय?
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यासोबत आदित्य ठाकरे यांची भेट होणार का ? अशी चर्चा सुरू असताना राज्यात राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.

मुंबई : महाराष्ट्रातील युवा नेते आदित्य ठाकरे आज हैदराबाद दौऱ्यावर आहेत. त्यादरम्यान आदित्य ठाकरे हे गीतम विद्यापीठाच्या माध्यमातून युवा राजकारणी आयोजित संवाद कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. याशिवाय तेथील विद्यार्थ्यांना संबोधित देखील करणार आहे. याच दरम्यान आदित्य ठाकरे हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचीही भेट घेणार असल्याचे म्हंटले आहे. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आदित्य ठाकरे हे विविध ठिकाणी दौरा करत आहे. मागील सहा महिन्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. विविध भागांमध्ये सभा घेत पक्षाला पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्यासाठी आदित्य ठाकरे मैदान गाजवत आहे.
आदित्य ठाकरे आज हैदराबाद दौऱ्यावर असून बेगम पेठ विमानतळावर पोहोचले आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि के टी राव यांच्या बैठक सुरू आहे. के टीराव हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांचे पुत्र असून ते तेलंगणाचे नगरविकास मंत्री आहे.
याच दरम्यान गीतम विद्यापीठ आयोजित युवा राजकारणी संवाद कार्यक्रमात आदित्य ठाकरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. खरंतर आदित्य ठाकरे हे हैदराबादमध्ये जाण्यामागील काय कारण असणार याबाबत राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.
यामध्ये आदित्य ठाकरे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीच जाणार होते का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. याशिवाय मागील काही दिवसांपासून बीआरएस पक्ष देखील महाराष्ट्रात प्रवेश करू इच्छित आहे. यामध्ये मराठवाड्यातही सभांचा धडाका त्यांनी लावला आहे.
तेलंगणात शेतकऱ्यांना मदत आणि राज्याची झालेली प्रगती. याशिवाय शेतकऱ्यांना मोफत वीज यांसह एकरी दहा हजार रुपयांची मदतीची महाराष्ट्रात घोषणा बघता मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर काही नवी राजकीय चाल असल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या अरविंद केजरीवाल यांनीही मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबाची भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले होते. त्यानंतर बीआरएस सोबत ठाकरे गत युती तर करणार नाही ना? किंवा बीआरएस पक्षाच्या सोबत नवी राजकीय चाल तर खेळली जाणार नाही ना? अशी ही चर्चा केली जात आहे.
तेलंगणा राज्यात झालेला विकास पाहता तो पॅटर्न महाराष्ट्रात रुजविण्यासाठी के चंद्रशेखर राव प्रयत्न करत आहे. विविध घोषणा करत त्यांनी नांदेड मध्ये येऊन त्यांनी हाकही दिली आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची चर्चा होते का ? याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.
