‘मुंबई महापालिकेनं नाल्यातील गाळाऐवजी नागरिकांच्या करातून माल काढला’, केशव उपाध्येंचा हल्लाबोल

| Updated on: Jun 09, 2021 | 2:38 PM

सायन, चेंबूर, अंधेरी, कुर्ला, गोरेगाव, वरळीसह मुंबईतील विविध भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महापालिकेवर जोरदार हल्ला चढवलाय.

मुंबई महापालिकेनं नाल्यातील गाळाऐवजी नागरिकांच्या करातून माल काढला, केशव उपाध्येंचा हल्लाबोल
मुंबई पाऊस आणि केशव उपाध्ये
Follow us on

मुंबई : मान्सूच्या पहिल्याच पावसात मुंबईसह उपनगरांमध्ये अनेक भागात पाणी साचलं आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेनं 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता. पण पुन्हा एकदा पहिल्याच पावसात मुंबईकरांनी दाणादाण उडाल्याचं पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावत मुंबईची दाणादाण उडवून दिली. मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे सायन, चेंबूर, अंधेरी, कुर्ला, गोरेगाव, वरळीसह मुंबईतील विविध भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महापालिकेवर जोरदार हल्ला चढवलाय. (Keshav Upadhyay criticizes Mumbai Municipal Corporation )

“पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. 104 टक्के गाळ काढल्याचा दावा केला गेला पण नाल्यातील गाळाऐवजी सर्वसामान्यांनी महापालिकेला भरलेल्या करातून माल काढला गेला. 100 कोटीच टार्गेट असणारा 1 सचिन वाजे सापडला पण असे सचिन वाजे ठिकठिकाणी असल्यावर सर्वसामान्य मुंबईकराच्या नशिबी तुंबलेली मुंबई”, अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुंबई महापालिकेवर गंभीर आरोप केलाय.

सत्ताधीशांचा वसुलीच्या नादच खुळा- शेलार

सत्ताधीशांचा वसुलीचा नादच खुळा, नेमेची येतो पावसाळा, अशा काव्यमय शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शेलार यांनी ट्विट करून पालिकेच्या भ्रष्ट कारभारावरच बोट ठेवलं आहे. मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबलंय. घरात पाणी घुसू लागलंय. नालेसफाई कधी 107% तर कधी 104% झाल्याच्या दाव्यांचे आकडे मोठे-मोठ्याने “वाझे”. पहिल्या पावसातच “कटकमिशन”चे सगळे व्यवहार उघडे पडले आहेत. मुंबईकर हो! सत्ताधीशांचा हा वसुलीचा नाद खुळा, नेमेची येतो पावसाळा… पाच वर्षांत 1 हजार कोटींचा घोटाळा, अशी काव्यात्मक टीका शेलार यांनी केली आहे.

पालिकेचा दावा काय?

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी काल मंगळवारी मुंबईतल्या विविध एजन्सीच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. त्यानंतर पालिकेने प्रसिद्धी पत्रक काढून मुंबईत 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता. मुंबईतील मोठ्या नाल्यांमधून पावसाळा पूर्व कामांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत अधिक म्हणजे 104 टक्के गाळ काढण्यात आला आहे. एकूण 3 लाख 11 हजार 381 मॅट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने यंदा समोर ठेवले होते. त्या तुलनेत 3 लाख 24 हजार 284 मॅट्रिक टन इतका गाळ काढून वाहून नेण्यात आला आहे. निश्चित केलेल्या मुदतीत म्हणजे मे अखेरीपर्यंत ही कामगिरी साध्य करण्यात आली आहे, असं पालिकेने म्हटलं होतं.

संबंधित बातम्या : 

Mumbai Rains : म्हणून मुंबई तुंबणारच, महापालिका आयुक्त चहल यांनी कारण सांगितलं!

महापालिकेचा 104 टक्के नालेसफाईचा दावा 12 तासांत फोल, मुंबई तुंबल्याने विरोधक बरसले

Keshav Upadhyay criticizes Mumbai Municipal Corporation