नितीन राऊतांचं ऊर्जा खातं नाना पटोलेंकडे जाणार? दोघेही एकाच वेळेस सोनियांच्या भेटीला

| Updated on: Feb 09, 2021 | 1:11 PM

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नाना पटोले पहिल्यांदाच दिल्ली दरबारी पोहोचले आहेत. (Nana Patole Sonia Gandhi Nitin Raut)

नितीन राऊतांचं ऊर्जा खातं नाना पटोलेंकडे जाणार? दोघेही एकाच वेळेस सोनियांच्या भेटीला
नाना पटोले, सोनिया गांधी, नितीन राऊत
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची झूल पांघरल्यानंतर काँँग्रेस नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या खांद्यावर मंत्रिपदाची जबाबदारीही येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाना पटोलेंना ऊर्जा मंत्रालयासारखं महत्त्वाचं खातं मिळण्याची शक्यता आहे. विद्यमान ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचं महत्त्व कमी न करता खातेबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. (Nana Patole meets Sonia Gandhi likely to get Power Ministry of Nitin Raut)

नाना पटोले आणि नितीन राऊत एकाच वेळी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या भेटीला गेले आहेत. राजधानी दिल्लीत झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मंत्रिपदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी सूचक प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे. त्यामुळे नाना पटोलेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नितीन राऊत यांच्याकडे असलेलं ऊर्जा खातं नाना पटोलेंकडे जाण्याची चिन्हं आहेत.

“काँग्रेसला एक नंबरचा पक्ष बनवणार”

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नाना पटोले पहिल्यांदाच दिल्ली दरबारी पोहोचले आहेत. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. तत्पूर्वी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना काँग्रेसला राज्यात एक नंबरचा पक्ष बनवणार, यासाठी वाटेल ते कष्ट घेईल, असा निर्धार नाना पटोले यांनी बोलून दाखवला होता.

नाना पटोले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचीही भेट घेऊन राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. महाराष्ट्रात काँग्रेसचं संघटन अधिक मजबूत कसं करता येईल, येणाऱ्या काळात कोणते धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, यासंबंधीची चर्चा झाल्याची माहिती पटोले यांनी दिली.

इंग्रज-मुघलांपेक्षा अधिक अत्याचार मोदी सरकारकडून

“राजधानी नवी दिल्लीच्या सीमेवर गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. यावर बोलताना नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं. मोदींनी काहीही बोललं तरी तो कायदा होतो पण दुसऱ्याने काही बोललं तर तो राष्ट्रद्रोह होतो. इंग्रज आणि मुघलांनी जेवढे अत्याचार केले नाहीत तेवढे अत्याचार आताचं विद्यमान सरकार शेतकऱ्यांवर करत आहेत”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

“दिल्लीत शेतकऱ्यांचं अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. खरंतर केंद्र शासनाने आतापर्यंत त्यांचं म्हणणं ऐकून तोडगा काढायला हवा होता. परंतु तोडगा काढण्याऐवजी देशाचे पंतप्रधान शेतकऱ्यांना हिणवत आहेत. हे देशाच्या दृष्टीने नक्कीच भूषणावह बाब नाही”, अशी टीका पटोले यांनी केली.

संबंधित बातम्या :

इंग्रज, मुघलांनी अत्याचार केले नाही ते मोदी सरकार करतंय : नाना पटोले

देवेंद्र फडणवीस मित्र आहेत, पण काहीही बोलतात : नाना पटोले

(Nana Patole meets Sonia Gandhi likely to get Power Ministry of Nitin Raut)