उद्धव ठाकरे आणि भुजबळांमध्ये नाशिकची जागा मॅनेज : माणिकराव कोकाटे

उद्धव ठाकरे आणि भुजबळांमध्ये नाशिकची जागा मॅनेज : माणिकराव कोकाटे

नाशिक : भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. प्रेमाने सांगितलं असतं, तर माघार घेतली असती, पण आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, ही निवडणूक लढणार आणि जिंकणार. नाशिकची जागा शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यात मॅनेज आहे, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाने मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले.

“उद्धव ठाकरे आणि भुजबळ यांच्यात मॅनेजमेंट”

नाशिकमध्ये सभा घेऊन माणिकराव कोकाटे यांनी प्रचाराची सुरुवात केली. बंडखोरी करत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना-भाजप युतीमध्ये नाशिकची जागा शिवसेनेकडून हेमंत गोडसे लढत आहेत, तर राष्ट्रवादीकडून या जागेवर छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे उमेदवार आहेत. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्यात ही जागा मॅनेज असल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंनी केला.

भुजबळ आणि माझे वैयक्तिक नाही, तर वैचारिक मतभेद आहेत. नाशिकमधून त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांची उमेदवारी निश्चित होती. कारण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं छगन भुजबळांसमोर काही चालत नाही. शिवसेनेचा उमेदवार हेमंत गोडसे हा भुजबळांचा उमेदवार आहे. भुजबळांनी हा उमेदवार उद्धव ठाकरेंकडून मागून घेतला. कारण, गोडसे हा पराभूत होणारा उमेदवार आहे. ठाकरे आणि भुजबळ यांची एकत्रित मॅनेजमेंट आहे, असा आरोप त्यांनी केला.

भुजबळांनी एवढी संपत्ती जमवली कशी?

मी सर्व जातींचा उमेदवार आहे. माझी निवडणूक जातीवर नाही, तर विकासाच्या मुद्द्यावर आहे. सगळी विकासकामं आम्हीच केल्याचा दावा भुजबळ कुटुंबीय करतात. सगळं पॅकेज बांधून घेतलंय भुजबळांनी. भाजी विकणारा माणूस 50 हजार कोटींचा माणूस कसा झाला? भुजबळांच्या हजारो एकर जमिनी आहेत, एवढी संपत्ती आली कुठून? असा सवाल त्यांनी भुजबळांना केला.

“संकटमोचकच तुमच्यावर गंडांतर आणायचा”

साडेचार वर्ष एकमेकांचा गळा धरणारे उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्ष अमित शाह एका रात्रीत आ गले लग जा असं म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झालं, उद्धव साहेब उत्तर द्या. कृषी खात्याला पूर्ण वेळ मंत्री का नाही, मुख्यमंत्री उत्तर द्या. शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार उदासिन आहे. नाशिकला मंत्री दिला नाही म्हणून मी काँग्रेस सोडली. आता, नाशिकला चार आमदार असताना भाजपने एकही मंत्री दिला नाही. मुख्यमंत्र्यांचं काम खूप चांगलं आहे. मात्र संकटमोचक हे एकमुखी रुद्राक्ष घालून ते फिरतायत. हा संकटमोचक एक दिवस तुमच्यावर गंडांतर आणेल, असं म्हणत कोकाटेंनी मंत्री गिरीश महाजनांवरही निशाणा साधला.

“आता माघार नाही”

दरम्यान, उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याने कोकाटेंची चौकशी सुरु करण्यात आली आहे. पण ACB च्या धमक्या मला देऊ नका. प्रेमाने बोलला असता तर माघार घेतली असती. आता शक्य नाही. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, त्यांना पुन्हा कर्ज नाही. कार्यकर्ते आणि जनता यांना न्याय देण्यासाठी माझी उमेदवारी आहे.  पैसा आणि दहशतवादावर निवडणुका जिंकता येत नाहीत. हा ढाण्या वाघ जिंकणार आणि दिल्लीत जाणार. सर्वपक्षीय नेत्यांना मी एकटा पुरा आहे, असं म्हणत भुजबळांनी जिल्ह्याचं राजकारण पैशांवर केलं, असा आरोपही त्यांनी केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI