‘मातोश्री’च्या निकटवर्तीय मंत्र्याची गृह खात्यात ढवळाढवळ, राष्ट्रवादीची नाराजी?

| Updated on: Jul 07, 2020 | 9:53 AM

'मातोश्री'वर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यात 20 मिनिटं चर्चा झाली. 10 पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांवरुन झालेल्या गोंधळाबाबत ही चर्चा होती

मातोश्रीच्या निकटवर्तीय मंत्र्याची गृह खात्यात ढवळाढवळ, राष्ट्रवादीची नाराजी?
Follow us on

मुंबई : ‘मातोश्री’च्या अत्यंत जवळ असलेला मुंबईतील एक मंत्री, जवळपास सर्वच आणि विशेषतः गृहमंत्र्यांच्या खात्यात ढवळाढवळ करत असल्याबद्दल राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काल ‘मातोश्री’ निवासस्थानी चर्चा झाली. (NCP allegedly expressed disappointment with Shivsena Minister Interference in Home Ministry)

मुंबईतील 10 उपायुक्तांच्या बदल्यांना 48 तासांच्या आत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी स्थगिती दिली होती. या स्थगितीमुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात तणाव असल्याचे सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करुन सगळा प्रकार जाणून घेतला. त्यानंतर गृहमंत्र्यांना सोबत घेऊन ‘मातोश्री’ गाठलं.

भविष्यात एकमेकांशी चर्चा करुनच बदल्या करण्याच्या सूत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीत एकमत झाल्याची माहिती आहे. ज्या बदल्यांना स्थगिती दिली आहे, तसेच ज्या बदल्या करायच्या आहेत, त्याबाबतची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे.

हेही वाचा : गौप्यस्फोटाला उत्तर गौप्यस्फोटाने, फडणवीसांच्या मुलाखतीला उत्तर पवारांच्या मुलाखतीने!

‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यात 20 मिनिटं चर्चा झाली. 10 पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांवरुन झालेल्या गोंधळाबाबत ही चर्चा होती. अनिल देशमुख यांनी आपली बाजू मांडली. पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आपल्याला विचारुनच बदल्या केल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

गृहखाते राष्ट्रवादीकडे असले, तरी मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असल्याने एकमेकांशी चर्चा करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या व्हायला हव्यात, असा आग्रही मुद्दा मुख्यमंत्र्यांनी बैठकीत मांडल्याचे कळते.

सत्तेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष सहभागी असल्याने महत्वाच्या बदल्या करताना या तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांना विश्वासात घेतले जावे, या मुद्यावर प्रामुख्याने चर्चा झाली.

हेही वाचा : …. म्हणून शरद पवारांना दुसऱ्यांदा ‘मातोश्री’वर जाण्याची वेळ?

महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर शरद पवार हे ‘मातोश्री’वर जाण्याची ही केवळ दुसरीच वेळ होती. पोलिसांच्या बदल्या आणि पारनेरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याचं एक कारण यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहेत. त्यामुळे शरद पवार यांना ‘मातोश्री’वर यावं लागल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही पाहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज! 

शरद पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा घटनाक्रम

  • 6.54 PM – शरद पवार मातोश्रीवरुन बाहेर पडले
  • 6.48 PM – एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर
  • 6.40 PM – अनिल देशमुख ‘मातोश्री’वरुन बाहेर पडले
  • 6.30 PM – मंत्री आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड ‘मातोश्री’वरुन बाहेर पडले
  • 6.01 PM – शरद पवार आणि अनिल देशमुख ‘मातोश्री’वर पोहोचले, जितेंद्र आव्हाडही सोबत