आमचं आम्ही बघू, मोदींना आम्ही विचारतो का, तुम्ही पत्नीला का सोडलं? : अजित पवार

आमचं आम्ही बघू, मोदींना आम्ही विचारतो का, तुम्ही पत्नीला का सोडलं? : अजित पवार

बारामती : अकलूजच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खास शैलीत उत्तर दिलं आहे. “पवारांचं नाव घेतल्याशिवाय नरेंद्र मोदी यांचं भाषणच पूर्ण होत नाही. पवार कुटुंब हा देशाचा प्रश्न नाही, आमच्या परिवाराचं काय करायचं ते आम्ही बघू. आम्ही तुमच्या परिवाराचं काढतो का? तुम्ही एकटे का राहता, असं विचारतो का? तुम्ही पत्नीला का सोडलं, असं विचारलं का?” असे प्रश्न विचारुन अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आज अजित पवार यांनी बारामती तालुक्यातल्या निरावागज, सांगवी आणि माळेगाव येथे सभा घेतल्या. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकलूजमध्ये शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर दिलं.

“शरद पवारांनी ऊस उत्पादकांचे प्रश्न मार्गी लावले नाहीत, असं मोदी म्हणतात. मात्र शरद पवारांनी साखर निर्यातीसह साखर उद्योगाला पोषक धोरण स्वीकारल्यामुळेच आज ऊसाला चांगला दर मिळत आहे.” असे सांगत अजित पवार पुढे म्हणाले, “सरकारनं सहकारी साखर कारखान्यांना परवानगी बंद केल्यानं खासगी कारखान्यांचा पर्याय पुढे आलाय. यात भाजप नेत्यांचेही खासगी साखर कारखाने आहेत. पण ते सत्ताधाऱ्यांना दिसत नाहीत का?”

माढ्यात पाण्याचा प्रश्न प्रलंबित असता तर 12 हजार टन गाळप क्षमता असणारे कारखाने कसे चालतात? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.

भाजपला अनेक दिवस उमेदवार मिळत नव्हता. पण राहुल कुल यांच्या कारखान्याला मुख्यमंत्र्यांनी 35 कोटींची मदत केलेल्या मदतीचं भांडवल करत त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. आम्ही विधानसभेत भेटायचो, पण त्यांनी कधी सांगितलं नाही की पत्नीला उभं करणार आहे, असं सांगतानाच त्यांचं (राहुल कुल) लग्न आपणच जमवल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *