उदयनराजेंच्या ‘भिक मागो’ आंदोलनाला शशिकांत शिंदेंचं प्रत्युत्तर

पुढे चालून लोक मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह आले आणि त्यांच्या जिवाचं काही बरंवाईट झालं तर त्याला उदयनराजेच जबाबदार असतील, असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय.

  • हर्षल भदाणे पाटील, टीव्ही ९ मराठी, नवी मुंबई
  • Published On - 20:54 PM, 10 Apr 2021
उदयनराजेंच्या 'भिक मागो' आंदोलनाला शशिकांत शिंदेंचं प्रत्युत्तर
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या आंदोलनावर शशिकांत शिंदे यांची टीका

नवी मुंबई : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारच्या विकेंड लॉकडाऊनच्या विरोधात हाती कटोरा घेऊन भिक मागो आंदोलन केलं. साताऱ्याच्या रस्त्यावर फिरुन आणि फुटपाथवर बसून त्यांनी भिक मागत सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. सरकारच्या भूमिकेमुळं राज्यातील गोरगरीब जनता, कामगार, छोटे व्यवयासिक यांच्यावर भिक मागण्याची वेळ येईल, असं मत उदयनराजेंनी व्यक्त केलंय. उदयनराजेंच्या या आंदोलनाला राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. (Shashikant Shinde criticizes MP Udayan Raje Bhosale’s agitation)

उदयनराजे भोसले राज्यात लॉकडाऊन नको असं म्हणत आहेत. पण पुढे चालून लोक मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह आले आणि त्यांच्या जिवाचं काही बरंवाईट झालं तर त्याला उदयनराजेच जबाबदार असतील, असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय. उदयनराजे यांचं आंदोलन हे केंद्र सरकारसाठी आहे. केंद्र सरकार राज्याला अपूर्ण सुविधा देतंय, त्यापासून लक्ष विचलीत करण्यासाठी उदयनराजेंचं आंदोलन असल्याची टीका शिंदे यांनी केलीय.

‘लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तुटेल’

लोकप्रतिनिधी म्हणून निर्णय घेताना परिस्थितीचं गांभिर्य ओळखून योग्य निर्णय घेणं गरजेचं असल्याचं शिंदे म्हणाले. विकेंड लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तुटणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आता कोरोना रुग्णांची आकडेवारी तिप्पट झाली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. अशावेळी लॉकडाऊन केला नाही तर परिस्थिती बिकट होईल, अशी भीती शिंदे यांनी व्यक्त केलीय.

उदयनराजेंचं भिक मागो आंदोलन

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी साताऱ्यातील पोवईनाक्यावर लॉकडाऊनविरोधात आंदोलन केले. हातात कटोरा घेऊन ते फुटपाथ भिक मागत त्यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. व्यापारी असतो तर जग इकडे तिकडे झाले असते तरी मी दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही, असे उदयनराजे भोसले यांनी ठणकावून सांगितलं.

सध्या वातावरणात अनेक व्हायरस आहेत. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. लोकांनी पहिल्या लॉकडाऊनवेळी ऐकले. आता लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. व्यापाऱ्यांनी कामगारांचे पगार कसे भागवायचे? सणासुदीचे दिवस असल्यामुळे व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला आहे. उद्या बँका हप्ते भरण्यासाठी व्यापाऱ्यांच्या मागे लागतील. त्यामुळे दुकानातील कामगारांना लस द्यावी. कामगारांना लस देऊनही दुकाने उघडण्यास परवानगी मिळत नसेल तर व्यापारी कसे ऐकणार, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला होता.

संबंधित बातम्या :

कटोरा घेऊन उदयनराजे रस्त्यावर, तर सातारचा दुसरा खासदार गहू काढण्यासाठी शेतात!

Shashikant Shinde criticizes MP Udayan Raje Bhosale’s agitation