पक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारलाय, पैठणमध्ये राडेबाज कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळेंचा दम

| Updated on: Feb 21, 2020 | 2:36 PM

संतापलेल्या सुप्रिया सुळे यांनी हा पक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारला आहे. पक्षाला कुणी बदनाम कराल तर गाठ माझ्याशी आहे असा दम भरल्याची माहिती आहे

पक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारलाय, पैठणमध्ये राडेबाज कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळेंचा दम
Follow us on

औरंगाबाद : मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्ता मेळाव्यात तुफान गोंधळ पाहायला मिळाला. संजय वाकचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांनी सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीतच (Supriya Sule Aurangabad Program Ruckus) गोंधळ घातला. संतापलेल्या सुप्रिया सुळे यांनी हा पक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारला आहे. पक्षाला कुणी बदनाम कराल तर गाठ माझ्याशी आहे असा दम भरल्याची माहिती आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीमधील गटबाजी समोर आली. संजय वाकचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांनी कार्यक्रमात गोंधळ घातला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी तुफान घोषणाबाजी करत राडा घातला. यावेळी सुप्रिया सुळे यांनाही काही काळ भाषण थांबवावं लागलं.

संजय वाकचौरे आणि दत्ता गोर्डे या दोघांमध्ये विधानसभेच्या तिकीटवरुन नाराजी होती. संजय वाकचौरे यांनी पक्षाकडे तिकीट मागितलं होतं, परंतु दत्ता गोर्डे यांना पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे वाकचौरे यांचे समर्थक नाराज होते. सुप्रिया सुळे कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त पैठणमध्ये आल्या असताना या नाराजीचं पर्यवसान तुफान राड्यात झालं. या गोंधळामुळे कार्यक्रमाचा पुरता बोजवारा उडाला.

दरम्यान, राड्यानंतर सुप्रिया सुळे यांनी वाकचौरे आणि गोर्डे या दोघांनाही गाडीत बसून जायला सांगितलं. त्या दोघांना घेऊन सुप्रिया सुळे पैठण शहराबाहेर गेल्या. संतापलेल्या सुप्रिया सुळे यांनी हा पक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारला आहे. पक्षाला कुणी बदनाम कराल तर गाठ माझ्याशी आहे असा दम भरल्याची माहिती आहे.

 

दरम्यान, कार्यकर्ता मेळाव्यात कोणताही गोंधळ झाला नाही, असा दावा संजय वाकचौरे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना केला. अपेक्षेपेक्षा जास्त कार्यकर्ते आल्याने पुरेशी आसनव्यवस्था नव्हती. पुढील कार्यकर्ते उभे राहिल्याने मागच्यांना दिसत नव्हतं. त्यामुळे गोंधळ झाल्यासारखं वाटलं, असा दावा वाकचौरेंनी केला. विकासाच्या मुद्द्यांना कार्यकर्त्यांनी ओरडून प्रोत्साहन दिल्यामुळे घोषणा दिल्याचा भास झाल्याचंही वाकचौरे म्हणाले. (Supriya Sule Aurangabad Program Ruckus)