खासदार होताच बाळ्या मामा अ‍ॅक्शन मोडवर, अनधिकृत बांधकामांची पाहणी

खासदार होताच बाळ्या मामा यांनी काल्हेर येथील शासकीय जमिनींवरील अनधिकृत बांधकामांची पाहणी केली. तर दुसरीकडे माजी खासदार कपिल पाटील यांच्या कुटुंबीयांनी आरोपांचे खंडन केलं आहे. आपल्यावर झालेल्या आरोपांप्रकरणी आपण कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचा इशारा दिला आहे.

खासदार होताच बाळ्या मामा अ‍ॅक्शन मोडवर, अनधिकृत बांधकामांची पाहणी
खासदार होताच बाळ्या मामा अ‍ॅक्शन मोडवर
| Updated on: Jun 07, 2024 | 9:45 PM

भिवंडी लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशी ते अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. बाळ्या मामा यांनी काल्हेर येथील शासकीय जमिनीवर केलेल्या अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणा यांची पाहणी केली. “जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो आहे. त्यामुळे येथील शेतकरी आणि जनसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मुख्य जबाबदारी माझ्यावर आहे. काल्हेर येथे सुमारे 26 एकर शासकीय जिमिनीसोबतच वन विभाग आणि स्थानिक नागरिकांच्या जमिनीवर नागरिकांना दमदाटी करून, अतिक्रमण करून येथील बांधकाम व्यावसायिक श्रीधर पाटील, भरत पाटील, नितीन पाटील यांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले आहे. या अनधिकृत बांधकामासाठी माजी खासदार कपिल पाटील आणि त्यांचा पुतण्या देवेश पाटील यांच्या नावाने हे बांधकाम व्यावसायिक येथील शेतकरी आणि नागरिकांना धमकावतात”, असा आरोप बाळ्या मामा यांनी केलाय.

“येथील स्थानिक गुंडांना हाताशी धरून बांधकाम व्यावसायिक जनतेची फसवणूक करत आहेत असा आरोप खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी यावेळी केला आहे. या प्रकरणी आपण तहसीलदार,उप विभागीय अधिकारी,जिल्हाधिकारी, एमएमआरडीए यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकाराची सर्व कागदपत्र आपण शासकीय यंत्रणेला सोपविणार आहोत”, असेही बाळ्या मामा यांनी यावेळी सांगितले.

‘मी शेतकऱ्यांना शब्द दिला होता की…’

“येथील बांधकाम व्यावसायिक जमिनीचे खोटे कागदपत्र दाखवून मध्यमवर्गीय गुंतवणूक करणाऱ्या कुटुंबीयांना घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना फसवतात. तसेच दादागिरी आणि दहशत वाढवली जात आहे. शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर मी इथे येऊन पाहणी केली. मी शेतकऱ्यांना शब्द दिला होता की मी निवडून आलो की दुसऱ्याच दिवशी या जागेची पाहणी करणार. तिसऱ्या दिवशी तक्रार करून जनतेला न्याय देणार. त्यामुळे आज घरी शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ लागलेली असताना ते कार्यक्रम आटोपते घेऊन या ठिकाणी अनधिकृत बांधकामांची पाहणी केली”, असं खासदार सुरेश म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. “केवळ केंद्रीय मंत्र्यांच्या आशीर्वादाने शासकीय यंत्रणा या अनधिकृत बांधकामांवर दुर्लक्ष करत आले आहेत. मात्र आता असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही”, असा इशारा देखील बाळ्या मामा यांनी दिला आहे.

‘आम्ही बाळ्या मामा यांना कायदेशीर नोटीस बजावणार’

या विषयावर कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचे पुतणे देवेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “बाळ्या मामा यांनी आरोप केलेल्या प्रोजेक्टमध्ये आमचा कोणताही संबंध नाही. उलट बाळ्या मामा यांनी प्रोजेक्टचे कागदपत्र तपासावे ते त्यांच्या नेत्याच्या नावे आहेत हे स्पष्ट होईल. त्यांनी आमच्यावर केलेल्या बेछुट आरोपांनंतर आम्ही लवकरच बाळ्या मामा यांना वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावणार आहोत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.