‘कुणबीमधून आरक्षण पाहिजे तर लंगोट घालणार का? वस्तारा घेणार का?’, प्रकाश शेंडगे यांचा मराठा समाजाला सवाल
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा आंदोलकांवर टीका केली आहे. ओबीसी आरक्षण हवं असेल तर लंगोट घालणार का? हातामध्ये वस्तरा घेणार का? असे सवाल प्रकाश शेंडगे यांनी केले आहेत. "कुणबी म्हणजे सामाजिक मागासलेले आहेत. यांचं कुणीही लंगोटी घालून फिरत नाही. तुम्ही आताही कोकणात गेलात तर आजही कोकणात कुणबी लंगोटी घालून फिरताना दिसेल. मग हे लंगोटी घालायला तयार आहेत का?", असं प्रकाश शेंडगे म्हणाले आहेत.
शंकर देवकुळे, Tv9 मराठी, सांगली | 8 डिसेंबर 2023 : मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण पाहिजे असल्यास त्यांनी लंगोट घालून फिरायाची तयारी ठेवावी, अशी टिप्पणी ओबीसी नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सांगलीत केली आहे. कोकणात आजही कुणबी हे लंगोट घालून फिरतात आणि मराठा समाजाची मागणी पाहिली तर त्यांना कुणबीमधून प्रमाणपत्र हवं आहे. तर त्यांनी अगोदर लंगोट घालून फिरावे. तसेच ते वस्तारा घेऊन फिरणार आहेत का? असा सवालही प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.
“सुरुवातीला त्यांची मागणी होती की, आम्हाला निजामाच्या काळातील नोंदी बघून कुणबी आरक्षण द्यावं. तेवढीच त्यांची मागणी होती. ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना ओबीसी आरक्षण द्यावं हे आम्ही मान्य केलं होतं. एखादा असेल निजाम काळातला, निजाम काळातल्या पावणे दोन कोटी नोंदी तपासल्यानंतर फक्त 11 हजार नोंदी सापडल्या. त्यानंतर त्यांनी परत भूमिका बदलली. पूर्ण महाराष्ट्रात सरसकट ओबीसी आरक्षण पाहिजे. हे आम्हाला अजिबात मान्य नाही”, असं प्रकाश शेंडगे म्हणाले.
‘दहा वर्ष लंगोट घालायला तुम्ही तयार आहात का?’
“कुणबी म्हणजे सामाजिक मागासलेले आहेत. यांचं कुणीही लंगोटी घालून फिरत नाही. तुम्ही आताही कोकणात गेलात तर आजही कोकणात कुणबी लंगोटी घालून फिरताना दिसेल. मग हे लंगोटी घालायला तयार आहेत का? तुम्हाला कुणबी आरक्षण हवं असेल तर दहा वर्ष लंगोट घालायला तुम्ही तयार आहात का? आमचा नाभिक समाज पिढ्यांपिढ्या सामाजिक भोग भोगतोय. मग आम्हाला कुणबी आरक्षण मिळालं. यांचे भोग तुम्ही भोगणार आहात का? तुम्ही हातात वस्तरा घेणार आहात का? नाही घेऊ शकतं. तुम्ही उच्च समाजातील आहात. तुम्ही क्षत्रिय आहात. मग तुम्ही कुणबी आरक्षणात कशाला येताय?”, असा सवाल प्रकाश शेंडगे यांनी केला.
“मराठा समाजाला आज घटनात्मक आरक्षण आहे. त्यांना ईडबल्यूएसचं 10 टक्क्यांपैकी साडेआठ टक्के आरक्षण दिलेलं आहे. मराठा समाज तीन-तीन ठिकाणी आरक्षण घेत आहे, हे सगळं थांबवायला पाहिजे. आमचाही गरीब समाज आहे. मराठा समाजावर गरीबी ही तुमच्यात भावबंधकींनी आणलेली आहे. सामाजिक आरक्षण हा गरीबी हटाव कार्यक्रम मुळीच नाही. मराठा समाजातील काही घटकांनादेखील ओबीसी प्रमाणपत्र घेण्यास विरोध आहे. त्यामुळे त्या लढ्याची धार बोचट होत चाललेली आपल्याला दिसेल”, असा दावा प्रकाश शेंडगे यांनी केला.
‘तुम्ही आमचा एक आमदार पाडाल, तर आम्ही तुमचे 160 पाडू’
मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. “सध्या सुरू असणाऱ्या अधिवेशनात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घ्यावा. ओबीसी समाजाला मराठा समाजाप्रमाणे निधी मंजूर करावा”, असे आवाहन शेंडगे यांनी केले आहे. याचबरोबर मंत्री छगन भुजबळ यांना आम्ही पाडू म्हणाऱ्यांना शेंडगे यांनी आव्हान देत “तुम्ही आमचा एक आमदार पाडाल, तर आम्ही तुमचे 160 पाडू”, असा इशाराही दिला.
मागासवर्ग आयोगात सुरू असणाऱ्या राजीनामा नाट्यावर नाराजी व्यक्त करीत शेंडगे यांनी याला मंत्री चंद्रकांत दादा पाटील हेच जबाबदार असल्याचे म्हटले. चंद्रकांत पाटील यांनी आयोगात हस्तक्षेप करणे योग्य नाही. घटनामत्मक दर्जा असणाऱ्या आयोगात दादांचा हस्तक्षेप चुकीचा असल्याचा आरोपही प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.