भागवत कराडांचा रात्री साडे बारा वाजता फोन आला होता, पंकजा मुंडेंनी नाराजी फेटाळली, आता म्हणाल्या सर्वांचं अभिनंदन

| Updated on: Jul 09, 2021 | 1:53 PM

प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. या चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. (pankaja munde)

भागवत कराडांचा रात्री साडे बारा वाजता फोन आला होता, पंकजा मुंडेंनी नाराजी फेटाळली, आता म्हणाल्या सर्वांचं अभिनंदन
pankaja munde
Follow us on

मुंबई: प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. या चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही. चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या, असं सांगत पंकजा यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच मंत्रिपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ते योग्यच होतं, असं सूचक विधानही त्यांनी केलं. (pankaja munde address media over news of being unhappy with bjp)

नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे त्या काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पत्रकार परिषदेत त्यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांचं अभिनंदन का केलं नाही, हे स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्रीपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दिल्लीला जाण्यासाठी तिकीटही काढलं होतं. त्यांनी मला तिकीटाचे फोटोही पाठवले होते. त्यामुळे आम्ही मुंबईतच असल्याचं ट्विट केलं होतं. त्यानंतर आम्ही नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण आमच्या नाराज असण्याचा प्रश्नच नाही. महाराष्ट्र किंवा दिल्लीत कोणतंही पद द्यायचं असेल तर मुंडे कुटुंबाचं नाव चालतं. त्यामुळे आमचं नाव चाललं. पण आमच्या नाराजीचा प्रश्नच नाही. कारण आम्ही कोणतीही मागणी केली नव्हती, असं पंकजा यांनी स्पष्ट केलं.

प्रीतम यांचं नाव चर्चेत ते योग्यच

भाजपमध्ये निर्णयाची एक पद्धत आहे. त्यानुसार घेतले जातात. सर्वच राज्यांच्या बाबतीत असे निर्णय घेतले आहेत. केवळ प्रीतम यांचंच नाही तर हिना गावित यांचं नावही चर्चेत होतं. पण नवीन लोकांनना संधी देण्यात आली. त्यावर हरकत नाही. त्यांच्यात नेतृत्व क्षमता आहे. म्हणूनच त्यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे, असं सांगतानाच प्रीतम ताईंचं नाव चर्चेत होतं आणि योग्य होतं. पण आता या चर्चांना विराम दिला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

म्हणून मंत्र्यांचं अभिनंदन केलं नाही

यावेळी त्यांनी मंत्र्यांचं अभिनंदन का केलं नाही याचंही कारण सांगितलं. परवा केवळ संभाव्य मंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ठोस काही येत नव्हतं. त्यामुळे मी कुणाचंही अभिनंदन केलं नाही. मात्र, आता मी केंद्रीय मंत्र्यांचं अभिनंदन करते. राज्यातून मंत्री झालेल्यांचंही अभिनंदन करते, असं त्या म्हणाल्या. मी भारती पवार आणि कपिल पाटील यांच्याशीही मी फोनवरून चर्चा केली. त्यांचं अभिनंदन केलं. तसेच भागवत कराड यांनी मला रात्री साडेबारा वाजता फोन केला होता. त्यांना दिल्लीतून फोन आल्याचं आणि दिल्लीला जात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, असंही त्यांनी सांगितलं. (pankaja munde address media over news of being unhappy with bjp)

 

संबंधित बातम्या:

पंकजा मुंडेंचे पंख छाटले, खडसेंना बाद केलं, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्वांना फडणवीसांनी संपवलं; शिवसेनेची टीका

नितीन राऊत, पटोले वाद राहुल गांधींच्या दरबारात?, थोरात, राऊत दिल्लीत दाखल!

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांवर बायपास सर्जरी, तीन महिने विश्रांती घेणार

(pankaja munde address media over news of being unhappy with bjp)