Pankaja Munde : बीडच पालकमंत्री पद नाहीच, अखेर पंकजा मुंडेंनी मनातल्या भावना दाखवल्या बोलून
Pankaja Munde : पहाटेचा शपथविधी कट होता असं धनंजय मंडे म्हणाले, यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, "यावर तेच उत्तर देऊ शकतील. कोण काय म्हणाले, यावर मी उत्तर देऊ शकत नाही. मी माझ्या संदर्भातील प्रश्नावर बोलू शकते". बीडच्या पालक मंत्री पदाची संधी हुकली, त्यावरही पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे.

सरकार स्थापन होऊन महिना उलटला, तरी पालकमंत्री पदाची घोषणा होत नव्हती, त्यामुळे राजकीय वर्तुळात कुजबूज सुरु झालेली. अखेर दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री पदं जाहीर झाली आहेत. आता पालक मंत्री पदावरुनही नाराजीची चर्चा आहे. पालक मंत्र्यांची घोषणा झाली, त्यावेळी सगळ्यांच लक्ष बीड जिल्ह्यावर होतं. बीडचा पालकमंत्री कोण होणार?. मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव आलं. त्यामुळे मागच्या अनेक दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरु होती. धनंजय मुंडे यांच्या नावाला जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा विरोध होता. बीड जिल्यातील आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस, शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आमदार-मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता. पंकजा मुंडे यांच्यावरही टीका केलेली.
अखेर सरकारने बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोपवली आहे. पंकजा मुंडे यांची संधी सुद्धा हुकली. पंकजा मुंडे आज अखेर यावर बोलल्या आहेत. “प्रत्येकवेळी तुम्हाला सेम काम करण्याची संधी मिळते असं होत नाही. बीडच पालकत्व मिळालं असतं, तर आनंद झाला असता. कुठल्याही संविधानिक पदावर नसताना मागची पाच वर्ष पूर्णवेळ संघटनेसाठी काम केलं. मी बीडची लेक आहे. बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती, तर आनंद झाला असता. बीडकरांनाही खूप आनंद झाला असता” असं आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
‘हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल’
“माझा पाच वर्षांचा कार्यकाळ हा बीडच्या इतिहासातील विकसनशील कार्यकाळ राहिला आहे. हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल. जो निर्णय झालाय, त्यावर कुठलीही असहमती न दर्शवता, जे आपल्याला मिळालं आहे, त्यात जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेत मी आहे” असं पंकजा मंडे म्हणाल्या.
‘त्या दोघांमध्ये काय संभाषण झालं, हे मला काय माहित’
“अजितदादा बीडचे पालकमंत्री आहेत. बीडची संघटना, कार्यकर्ते, बीडची जनता यांना संभाळताना अजितदादा आम्हाला सहकार्य करतील असा आम्हाला विश्वास आहे” असं पंकजा मुंडे म्हणाल्या. शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय अधिवेशनात अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचं कौतुक केलं. त्यावर पत्रकारांनी विचारलं असता, पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मी यावर काय उत्तर द्यायच?. त्या दोघांमध्ये काय संभाषण झालं, हे मला काय माहित”