विजयला मुख्यमंत्री होण्यापासून रोखलं जातंय? राज्यपालांचं वर्तन घृणास्पद, प्रकाश राज संतापले

तमिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्रीपदावरून तमिळनाडूत नवीन वाद सुरु झाला आहे. अशातच आता विजयच्या समर्थनार्थ प्रकाश राज मैदानात उतरले आहेत.

विजयला मुख्यमंत्री होण्यापासून रोखलं जातंय? राज्यपालांचं वर्तन घृणास्पद, प्रकाश राज संतापले
| Updated on: May 08, 2026 | 1:29 PM

Vijay Thalapathy : तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. अभिनेता ते राजकारणी बनलेला थलपती विजयच्या TVK पक्षाने विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला असला तरी अद्याप त्याला सरकार स्थापन करता आलेले नाही. याच मुद्द्यावरून आता अभिनेते प्रकाश राज यांनी उघडपणे विजयला पाठिंबा दिला असून तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत TVK पक्षाने 233 पैकी तब्बल 108 जागांवर विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधले. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या पक्षाने DMK आणि AIADMK सारख्या जुन्या आणि प्रभावशाली पक्षांनाही मागे टाकले.

राज्यात विजयच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असताना सरकार स्थापनेसाठी आवश्यक बहुमत मात्र त्याच्या हातात नाही. सरकार स्थापन करण्यासाठी 118 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे तर TVK कडे सध्या 108 जागा आहेत. विजय यांनी दोन मतदारसंघांतून विजय मिळवला असल्याने त्यांना एक जागा सोडावी लागणार आहे. त्यामुळे पक्षाची ताकद 107 वर येणार आहे.

राज्यपालांनी सरकार स्थापनेचे आमंत्रण नाकारले

6 मे रोजी थलपती विजयने सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली होती. मात्र आवश्यक बहुमत नसल्याचे सांगत राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्यास नकार दिला. दुसऱ्या दिवशीही विजयने पुन्हा प्रयत्न केला परंतु त्यावेळीही निराशाच पदरी पडली.

यामुळे तमिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विजयच्या समर्थकांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून विरोधकांनीही यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

प्रकाश राज यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर संतप्त पोस्ट शेअर केली. त्यांनी TVK कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ री-शेअर करत लिहिले की, ‘राज्यपालांचे हे वर्तन घृणास्पद, अस्वीकार्य आणि असंवैधानिक आहे. मतभेद असू शकतात पण विजयला जनतेचा कौल मिळाला आहे. त्याला सभागृहात बहुमत सिद्ध करण्याची संधी मिळायलाच हवी.’ त्यानंतर आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, ‘जनतेच्या कौलाचा आदर करा आणि विजयला सरकार स्थापनेचा हक्क बजावू द्या.’

एका मुलाखतीतही प्रकाश राज यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ‘बहुमताचा निर्णय राजभवनात नाही तर विधानसभेत होतो. राज्यपालांना हा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. विजयला बहुमत सिद्ध करू द्या, असे ते म्हणाले.

Follow Us