‘तोडपाणी करण्यासाठी सगळं सुरु’, तपास यंत्रणांच्या धाडीवरुन पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

| Updated on: Oct 24, 2021 | 2:45 PM

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. धाडी टाकायच्या, फोटो काढायचे आणि पेपरबाजी करायची, सध्या राज्यात हे सगळं सुरु असल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय.

तोडपाणी करण्यासाठी सगळं सुरु, तपास यंत्रणांच्या धाडीवरुन पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप
पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री
Follow us on

कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते आणि मंत्र्यांवर सध्या ईडी, सीबीआय, आयकर विभाग आदी केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडसत्र सुरु आहे. या छापेमारीवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात येतेय. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. धाडी टाकायच्या, फोटो काढायचे आणि पेपरबाजी करायची, सध्या राज्यात हे सगळं सुरु असल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय. (Prithviraj Chavan criticizes the central government and the BJP over actions of the Central Investigation Agency)

पृथ्वीराज चव्हाणांची केंद्रावर टीका

केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडीबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, धाडी टाकायच्या, फोटो काढायचे आणि पेपरबाजी करायची, सध्या राज्यात हे सगळं सुरु आहे. पण सगळं झाल्यावर कुणालातरी शिक्षा झाली आहे का? एक दिवसाची जरी शिक्षा झाली असती तर आम्ही मानलं असतं. पण सगळं तोडपाणी करण्याकरता हे सगळं चाललं आहे. केवळ आपल्या पक्षात घेण्यासाठी मोदी सरकारकडून नेत्यांना भीती घालण्याचं काम सुरु असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.

मुख्यमंत्री आणि पवारांमध्ये महत्वपूर्ण बैठक

दरम्यान, चार दिवसांपूर्वी म्हणजे 20 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका निवडणुका आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा या विषयांवर चर्चा झाली. महाविकास आघाडीतील अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, भावना गवळी अशा नेत्यांच्या मागे सध्या सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीचे शुल्ककाष्ट लागलेले आहे. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, आता या यंत्रणांना न घाबरता त्यांच्याविरोधात एकत्रितपणे लढा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी घेतला आहे. त्याबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

‘देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे’

केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा राज्य सरकारला त्रास देण्यासाठी काम करत आहेत. राज्य सरकारमधल्या अनेकांना त्रास दिला. पण काही होत नाही हे पाहिल्यावर जरा मोठ्याला हात घालू म्हणून अजित पवार यांच्या कुटुंबियांवर धाडी टाकल्या जात आहे. पण ईडी-फिडी काहीही येऊ द्या, हे सरकार पडणार नाही. आता सत्ता त्याच्या हातात आहे म्हणून ते काही करत आहेत. हे फार दिवस चालत नाही. देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे, असं आवाहन शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये बोलताना केलं होतं.

इतर बातम्या :

कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या, पंचाच्या खळबळजनक दाव्यानंतर संजय राऊत अ‌ॅक्शन मोडमध्ये, महाराष्ट्र पोलिसांकडे महत्त्वाची मागणी

पिंपरी-चिंचवडनंतर पुणे महापालिकेसाठी शरद पवार मैदानात, दिवाळीनंतर बैठकीचं आयोजन

Prithviraj Chavan criticizes the central government and the BJP over actions of the Central Investigation Agency