पुणे ग्रँड टूर यंदाही भव्य आणि जागतिक दर्जाची होणार; स्पर्धेच्या तयारीला वेग द्या, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आज पुणे दौऱ्यावर होत्या, त्यांनी शासकीय विश्रामगृहात बैठक घेत नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या.

अजितदादांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेने अल्पावधीतच जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. आगामी काळात २०३२ ची वर्ल्ड चॅम्पियनशिप पुण्यात होणार असून, यंदाच्या पुणे ग्रँड टूर स्पर्धेची व्याप्तीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तब्बल ९० देशांमधून या स्पर्धेसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे यंदाची स्पर्धा अधिक भव्य आणि जागतिक दर्जाची होण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध तयारी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी दिले.पुणे ग्रँड टूरच्या आयोजनासंदर्भात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना सुनेत्रा म्हणाल्या की, आदरणीय दादांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या स्पर्धेने अत्यंत कमी कालावधीत जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवला आहे. यंदा स्पर्धेची व्याप्ती वाढली असून, त्यासाठी आवश्यक असणारा रस्ते विकासाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही रस्त्यांची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत. स्पर्धेच्या मार्गावरील रस्त्यांच्या कामांमध्ये कोणतीही तडजोड होता कामा नये.
स्पर्धेच्या काळात वाहतुकीचे योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वाहतुकीसंदर्भात केलेले नियोजन नागरिकांना आणि प्रवाशांना वेळेत समजेल, याची प्रशासनाने काळजी घ्यावी. लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांचाही गांभीर्याने विचार करून त्यानुसार आवश्यक कार्यवाही करावी.
सायकल स्पर्धेला दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांचे नाव द्या
पुण्याला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारी ही स्पर्धा यंदाही मागील वर्षाप्रमाणेच भव्य, दर्जेदार आणि यशस्वी होईल, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान,या बैठकीत उपस्थित आमदारांनी पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेला दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली.
सुनेत्रा पवार यांची तातडीने कार्यवाही
उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आज पुणे दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृह येथे बैठकीसाठी उपस्थित होत्या. बैठक संपल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.यावेळी सुनेत्रावहिनींनी प्रत्येक नागरिकाशी थेट संवाद साधत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. नागरिकांच्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरूपाच्या अडचणी समजून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
नागरिकांची मोठी गर्दी असतानाही प्रत्येकाची समस्या जाणून घेण्याची आणि त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्याची सुनेत्रावहिनींची कार्यपद्धती पाहून उपस्थितांना लोकनेते अजितदादा पवार यांच्या कामाच्या शैलीची आठवण झाली. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांची कामे मार्गी लावण्याची दादांची कार्यशैली आजही त्यांच्या सहकाऱ्यांच्या आणि कुटुंबीयांच्या कामातून अनुभवायला मिळत असल्याची भावना यावेळी नागरिकांमध्ये व्यक्त होत होती.
