पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अतिउत्साह, निकालाआधीच उमेदवाराचे विजयी बॅनर

सचिन दोडके यांचे समर्थक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात निकालाआधीच त्यांच्या विजयाच्या जल्लोषाची तयारी केली आहे.

पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अतिउत्साह, निकालाआधीच उमेदवाराचे विजयी बॅनर


पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकांचं मतदान होत नाही, तोच पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अतिउत्साह पाहायला मिळाला. खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे विजयी फलक निकालाआधीच झळकल्यामुळे (Pune NCP Candidate Victory Banner) आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर सचिन शिवाजीराव दोडके निवडणुकीला उभे आहेत. काल (सोमवारी) राज्यभरात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. निकाल जाहीर होण्यास तीन दिवसांचा अवधी असतानाच दोडके यांच्या विजयाचे बॅनर खडकवासल्यात झळकले आहेत.

दोडके यांचे समर्थक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निकालाआधीच त्यांच्या विजयाच्या जल्लोषाची तयारी केली आहे. विशेष म्हणजे दोडके प्रचंड बहुमताने विजयी होतील, असा विश्वासही कार्यकर्त्यांना दिसत आहे.

काय लिहिलं आहे विजयी बॅनरवर?

‘राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व महाआघाडीचे अधिकृत उमेदवार सचिन शिवाजीराव दोडके यांची आमदार पदी प्रचंड बहुमतांनी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन’ असं सचिन दोडके यांच्या विजयी बॅनरवर लिहिलं आहे. बॅनरवर सचिन दोडके यांच्यासह शरद पवार यांचाही फोटो दिसत आहे. शुभेच्छुक म्हणून खडकवासला विधानसभा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं नाव आहे.

खडकवासला हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. लोकसभा निवडणुकीच्या वेळी या मतदारसंघातूनच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे 50 हजारांपेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर होत्या. मात्र अवघ्या पाच महिन्यांतच मतदारांचा कौल आपल्याला मिळेल, असा विश्वास (Pune NCP Candidate Victory Banner) राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिसत आहे.

Maharashtra Exit Poll : सर्व एक्झिट पोलची आकडेवारी एकाच ठिकाणी

खडकवासला मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार भीमराव तपकीर यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे दोडके यांना विद्यमान आमदाराचं साम्राज्य खालसा करण्याचं तगडं आव्हान आहे.

पुण्यातील 21 जागांपैकी इंदापूर, बारामती आणि आंबेगाव या मतदारसंघांचा अपवाद वगळता कुठेही राष्ट्रवादीचा आमदार नाही. त्यातच दोडकेंच्या कार्यकर्त्यांना मात्र आपले नेते प्रचंड बहुमतानी विजयी होतील, हा विश्वास वाटत असल्याने पुणेकरांची बोटं तोंडात गेली आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये काल मतदान प्रक्रिया पार पडली. येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती येतील. एकूण 3 हजार 237 उमेदवार विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात आहेत.

राज्यभरात अंदाजे 66.20 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सर्वात कमी मतदान झालेल्या पाच मतदारसंघांमध्ये पुणे कँटोन्मेंटचा समावेश आहे. इथे 42.68 टक्के मतदान झालं.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI