मिमिक्री करणं राज ठाकरे यांचा जन्मसिद्ध हक्क; ‘त्या’ मिमिक्रीला अजित पवार यांचं खोचक उत्तर

Ajit Pawar on Raj Thackeray Ratnagiri Sabha Mimicry : राज ठाकरे यांच्याकडून अजित पवार यांची मिमिक्री; अजित पवार यांचं उत्तर, म्हणाले...

मिमिक्री करणं राज ठाकरे यांचा जन्मसिद्ध हक्क; त्या मिमिक्रीला अजित पवार यांचं खोचक उत्तर
| Edited By: | Updated on: May 07, 2023 | 3:33 PM

बारामती, पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल रत्नागिरीत सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मिमिक्री केली. त्याला अजित पवार यांनी खोचक उत्तर दिलं आहे. तसंच शरद पवार यांचा राजीनामा, महाविकास आघाडीचं भवितव्य यावरही अजित पवार बोललेत.

अजित पवारांचं राज ठाकरेंना उत्तर

राज ठाकरे यांना मिमिक्री शिवाय काय जमतं? मिमिक्री करणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

राज ठाकरेंना जनतेनं नाकारलं आहे. त्यांनी पाठीमागे बाहेर पडल्यानंतर निवडणुकीत 14 आमदार निवडून आणले. दुसऱ्या टर्मला त्यांचा फक्त एकच आमदार निवडून आला. तो पण आमच्या सहकाऱ्याने निवडून आला. त्यांच्याबरोबरची बरेच लोक त्यांना सोडून गेले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:चा पक्ष वाढवण्याच्या ऐवजी त्यांना अजित पवारावर मिमिक्री करणं आणि अजित पवारांचं व्यंगचित्र काढणं याच्यात त्यांना समाधान वाटतं. याच्यातून ते आनंदी होत असेल तर त्यांना शुभेच्छा, असं अजित पवार म्हणालेत.

शरद पवारांचा राजीनामा प्रकरण आणि राष्ट्रवादीतील घडामोडी

शरद पवार यांचा राजीनामा आणि घेतलेली माघार यावरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तो विषय आमच्या दृष्टीने संपलेला आहे. सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. त्यात आता चर्चा करण्याचं काही कारण नाही. पवारसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन जे सांगायचं ते सांगितलंय. काल पवारसाहेब बारामतीतही माध्यमांशी बोलले आहेत. त्यांचं जे मत आहे तेच आमचंही मत आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

महाविकास आघाडी एकत्र होती. आता आहे आणि पुढेही राहणार. मविआसंदर्भातील आमची कामं सुरुच आहेत, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या कर्नाटकात आहेत. निवडणूक प्रचारासाठी ते बंगळुरू दौऱ्यावर गेले आहे. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला काय करायचं मुख्यमंत्री कुठे गेले? काय करतात? मी त्यांच्या वॉचवर नाहीये.माझं माझं काम सुरु आहे. माझं काम मला करु द्या, असं अजित पवार म्हणालेत.