Pune Teacher MLC Election Result : पुणे शिक्षकमध्ये गुलाल उधळला तरी कौस्तुक गावडेंच्या मनात सल कायम, पहिल्याच प्रतिक्रियेत मन मोकळं केलं!
माझ्या वयाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मी कोणत्याही टीकाला आजपर्यंत उत्तर दिलेलं नाही. ज्यांनी माझ्या वयाचा मुद्दा उपस्थित केला, त्यांना शिक्षकांनीच उत्तर दिलेले आहे, असे कौस्तुभ गावडे म्हणाले.

Pune Teachers MLC Election Result Today : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपाचे कौस्तुभ गावडे यांनी बाजी मारली आहे. आता फक्त त्यांच्या औपचारिक विजयाची घोषणा बाकी आहे. या जागेवर शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिन सानप पराभूत झाले आहेत. ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे जयंत आसगावकर हे आहेत. दरम्यान, या विजयानंतर कौस्तुभ गावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिक्षक मतदारांचे आभार मानले आहेत. पुण्यात शिक्षक मतदारसंघात भाजपाचा विजय झालाय. परंतु पुणे पदवीधरमध्ये भाजपाचा पराभव होत आहे. त्यामुळे येथे गड आला पण सिंह गेला अशी भाजपाची स्थिती आहे. यावरही गावडे यांनी भाष्य केले.
माझा शेवटचा श्वास शिक्षकांच्या कामासाठी
माध्यम प्रतिनिधींशी बोलताना, “पुणे शिक्षक मतदारसंघ हा विचारवंतांचा मतदारसंघ आहे. या जिल्ह्यात मोठी शैक्षणिक क्रांती घडलेली आहे. मी जर काम केलं नाही तर हे शिक्षक मतदार मला भविष्यात माझी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे शिक्षकांचे काम मला करावे लागणार आहे. मी शिक्षकांच्या कामासाठी माझा शेवटचा श्वास अर्पित करतो,” असे आश्वासन त्यांनी शिक्षक मतदारांना दिले.
आम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार केला पण…
तसेच, माझ्या वयाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मी कोणत्याही टीकाला आजपर्यंत उत्तर दिलेलं नाही. ज्यांनी माझ्या वयाचा मुद्दा उपस्थित केला, त्यांना शिक्षकांनीच उत्तर दिलेले आहे, असेही ते म्हणाले. पुण्याच्या दोन्ही जागा येतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. परंतु पुणे पदवीधर या जागेवर भाजपाचा पराभव होण्याची शक्यता आहे. यावर बोलताना महायुती म्हणून आम्ही महाराष्टातील पाच जागा आम्ही लढत होतो. यातील तीन जागा या भाजपाच्या होत्या. पुणे शिक्षक आणि पुणे पदवीधर या दोन्ही जागांचा यात समावेश होता. मी आणि स्मीता जाधव अशा दोघांनीही खांद्याला खांदा लावून प्रचाराचे काम केले. परंतु मतदारांचा कौल आपण मान्य केला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पुढच्या निवडणुकीत आम्ही…
तसेच, मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. या दोन्ही जागा महायुतीच्याच पारंपरिक जागा होत्या. आमची ही जागा केली, याचं दु:ख नक्कीच आहे. परंतु आम्ही मतदारांचा कौल मान्य करू. येत्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात पुणे पदवीधर मतदारसंघात संघटना मजबूत करू. पुडच्या निवडणुकीत आम्ही जागा खेचून आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
