Pune News: आदिवासींच्या जमिनीसाठी 10 कोटींची डील? प्रकल्पाला विरोध करणारा नेताच निघाला मास्टरमाईंड, पुणे जिल्ह्यात खळबळ
दहा कोटींच्या बदल्यात कंपनीला आदिवासींची जमिन मिळवून देण्याचा दावा करणारे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे वादात सापडलेत. कंपनीच्या एका अधिकाऱ्यासोबत देवराम लांडे आणि त्यांचा मुलगा अमोल लांडे हे बोलणी करत असल्याची कथित ऑडिओ क्लीप समोर आली आहे. त्याचबरोबर देवराम लांडे यांच्या स्टींग ऑपरेशनचा एक कथित व्हिडीओ देखील समोर आला आहे.

Pune Adivasi Land Deal News: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे आणि त्यांचाय मुलाच्या कथित ऑडियो- व्हिडिओ क्लीपने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. देवराम लांडे यांच्या मुलाची १० कोटींच्या बदल्यात कंपनीला आदिवासींची जमीन मिळवून देण्याबाबत कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. दुसरीकडे लांडे यांचा हवाला व्यवहारासाठी २०० रुपयांच्या नोटेचे दोन तुकडे करून देवाणघेवाण करतानाचा व्हिडीओ समोरही आला आहे. एकीकडे आंदोलन करुन प्रकल्पाला विरोध करण्यात पुढे असणाऱ्या लांडे यांनीच जमिनीची डील केल्याने पुणे जिल्ह्यात वातावरण चांगलंच तापले आहे.
आदिवासींच्या जमिनीसाठी 10 कोटीची डील?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दहा कोटींच्या बदल्यात कंपनीला आदिवासींची जमिन मिळवून देण्याचा दावा करणारे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे वादात सापडलेत. कंपनीच्या एका अधिकाऱ्यासोबत देवराम लांडे आणि त्यांचा मुलगा अमोल लांडे हे बोलणी करत असल्याची कथित ऑडिओ क्लीप समोर आली आहे. त्याचबरोबर देवराम लांडे यांच्या स्टींग ऑपरेशनचा एक कथित व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये ते दहा कोटींची रक्कम हवाला मार्फत स्विकारायचे ठरल्यावर दोनशे रुपयांच्या नोटेचे दोन तुकडे करुन त्यांची देवाणघेवाण झाल्याचे दिसत आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोत्यात…!
देवराम लांडे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते असुन त्यांची सुन जुन्नर तालुक्यातुन विद्यमान सरपंच आहे. देवराम लांडे यांनी २०२४ ला वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. देवराम लांडे या ऑडियो क्लीपमधे प्रकल्पांबद्दल बातम्या देणाऱ्या स्थानिक पत्रकारांना आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार अतुल बेनके यांनाही आपण कंपनीच्या बाजुने वळवून घेऊ असा दावा करत आहेत. तसेच देवराम लांडे यांनी या ऑडिओ क्लीपमधे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याच समोर आले आहे.
प्रकल्पाला विरोध करण्याचा दिखावा अन् पाठीमागे डील?
धक्कादायक बाब म्हणजे, पुणे जिल्हातील जुन्नर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या जलविद्युत प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांमध्ये देवराम लांडे आघाडीवर होते. एवढच नाही तर ठाणे जिल्यातील मुरबाड तालुक्यात होत असलेल्या टोरंट कंपनीच्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी देखील लांडे यांनी आंदोलने केली होती. मात्र लांडे यांची आंदोलने म्हणजे दिखावा असल्याचे आता समोर आले आहे.
दरम्यान, लांडे यांनी आपणास फोन करणाऱ्या व्यक्तीने दहा कोटींचे अमिष दाखवल्याने आपण त्या व्यक्तीला भेटलो असा दावा केला आहे. त्याचबरोबर आपणला संबंधित व्यक्तीचा फोन आला होता, मात्र आपण त्याला पुराव्यांसह पकडून देण्यासाठी त्याच्याशी बोलत होतो असा दावा केलाय. देवराम लांडेंशी कंपनीचा अधिकारी म्हणून काम करणारा व्यक्ती हा जुन्नर तालुक्यातील स्थानिक व्यक्तीच असल्याची चर्चा आहे. तर देवराम लांडे यांनी देखील या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीसांकडे तक्रार दिली आहे.
(टीप: टीव्ही9 मराठी या ऑडिया- व्हिडिओ क्लीपची पुष्ठी करत नाही)
