पंजाब काँग्रेसमधील तिढा सुटला, अमरिंदर सिंह यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा निर्णय, सिद्धूंना कोणतं पद?

पंजाबमध्ये दोन कार्यकारी अध्यक्षही नियुक्त करण्यात येणार आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे. सध्या सुनील जाखड हे पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

पंजाब काँग्रेसमधील तिढा सुटला, अमरिंदर सिंह यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा निर्णय, सिद्धूंना कोणतं पद?
Amarinder Singh

चंदीगड : पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या वादावर अखेर तोडगा काढण्यात (Punjab Congress Crisis) पक्षश्रेष्ठींना यश आलं आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह (CM Amrinder Singh) आणि नवज्योतसिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यातील वाद आपसात मिटवण्यात येत आहे. नव्या फॉर्म्युल्यानुसार अमरिंदर सिंह हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहतील, तर सिद्धूंना पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात येणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पंजाबमध्ये दोन कार्यकारी अध्यक्षही नियुक्त करण्यात येणार आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे. सध्या सुनील जाखड हे पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

नवज्योतसिंह सिद्धू यांच्या गटाने कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत, त्यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली होती. त्यावरुन पंजाबचा हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला होता. पंजाबमधील बंडखोरी रोखण्यासाठी त्रिसूत्री फॉर्म्युला तयार करण्यात येत होता. त्यानुसार दोन उपमुख्यमंत्री आणि नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार होता. याशिवाय नवज्योतसिंह सिद्धू यांना प्रचार समिती प्रमुख बनवलं जाऊ शकतं, असं सांगितलं जात होतं. मात्र आता कॅप्टन अमरिंदर सिंह हे मुख्यमंत्रिपदी तर नवज्योतसिंह सिद्धू प्रदेशाध्यपदी विराजमान होणार आहेत.

तीन सदस्यांचं पॅनल

पंजाबमधील वादाबाबत सर्व आमदार आणि मंत्र्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी हायकमांडने तीन सदस्याचं पॅनल तयार केलं होतं. काँग्रेस नेते हरिश रावत यांच्या नेतृत्वात हे पॅनल तयार करण्यात आलं. त्यात मल्लिकार्जुन खरगे आणि जेपी अग्रवाल यांचा समावेश आहे. हे पॅनल एकाएका आमदार आणि मंत्र्याशी चर्चा करून त्यांचं म्हणणं ऐकणार आहेत. त्यानंतर हा अहवाल हायकमांडला देण्यात येणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

नेमका वाद काय?

पंजाबमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी होत असताना, काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पंजाब काँग्रेस दोन गटात विभागली आहे. एक गट नवज्योत सिद्धू यांचा तर दुसरा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा आहे. अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी होत आहे. त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आमदारांनी आवाज उठवला आहे. हे प्रकरण इतकं वाढलं आहे की, काँग्रेसच्या केंद्रीय समितीला हस्तक्षेप करावा लागला.

पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे हायकमांडने या 25 आमदार आणि मंत्र्यांना दिल्लीत बोलावलं होतं. या सर्व आमदारांशी काँग्रेसच्या तीन सदस्यांच्या पॅनलने चर्चा केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील झाखड, मंत्री चरणजीत चन्नी, सुखजिंदर सिंह रंधवा आदींचा या बंडखोरांमध्ये समावेश आहे. निवडणुकीच्या काळात राज्यातील जनतेला काँग्रेसकडून आश्वासने देण्यात आली होती. या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सवाल करण्यास सुरुवात केली. परिणामी मुख्यमंत्री आणि या आमदारांमध्ये तणाव निर्माण झाला.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांची भूमिका

मीडिया रिपोर्टनुसार, अमरिंदर सिंह यांनी उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपद शीख समुदायाकडे देणं हे पक्षाला परवडणारं नाही हे आधीच कळवलं आहे. स्वत: मुख्यमंत्रीपद हे शीख समाजाकडे आहे, त्यामुळे अन्य पदे अन्य जातींकडे विभागायला हवी असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक समीकरण जुळवणं मोठं आव्हान आहे.

संबंधित बातम्या  

नवज्योतसिंग सिद्धू उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी नकोच: मुख्यमंत्री अमरिंदर सिंग

अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू, पंजाबमध्ये निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान, नेमका वाद काय?

पंजाबमध्ये राजकीय भूकंप?, 25 आमदार दिल्लीत; मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याविरोधात मोर्चेबांधणी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI