आधी ईडी भेटीवेळी साथ, मग पुतण्याच्या शपथविधीली हजेरी, आता कुंदाताई लेकाच्या महाअधिवेशनात!

राज ठाकरे यांच्या मनसेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईत होत आहे. याची जय्यत तयारी मनसेने केली आहे. गोरेगावातील नेस्को मैदानावर हे अधिवेशन होत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:48 AM, 23 Jan 2020
आधी ईडी भेटीवेळी साथ, मग पुतण्याच्या शपथविधीली हजेरी, आता कुंदाताई लेकाच्या महाअधिवेशनात!

मुंबई : राज ठाकरे यांच्या मनसेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईत होत आहे. याची जय्यत तयारी मनसेने केली आहे. गोरेगावातील नेस्को मैदानावर हे अधिवेशन होत आहे. राज ठाकरे (Raj Thackerays mother Kunda Thackeray) यांनी या अधिवेशनाची सुरुवात मनसेच्या नव्या झेंड्याच्या अनावरणाने केली. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून त्यावर मध्यभागी राजमुद्रा आहे. महाअधिवेशनाच्या सुरुवातीलाच मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करुन राज ठाकरेंनी पक्ष कात टाकत असल्याचे संकेत दिले आहेत. (Raj Thackerays mother Kunda Thackeray)

दरम्यान, मनसेच्या या अधिवेशनासाठी राज ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब गोरेगावातील नेस्को मैदानावर उपस्थित आहेत. सकाळी साडेआठच्या सुमारास राज ठाकरे यांचं कुटुंब कृष्णकुंज निवासस्थानावरुन अधिवेशनस्थळाकडे रवाना झालं. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला, मुलगा अमित, मुलगी उर्वशी आणि सून मिताली हे सर्व अधिवेशनाला उपस्थित आहेत. मात्र या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेत होत्या, त्या म्हणजे राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे.

राज ठाकरे यांच्यासोबत आख्खं कुटुंब असताना, त्यांच्या मातोश्रीही सोबत दिसल्याने, राज ठाकरेंच्या कुटुंबात या अधिवेशनाची कितपत उत्सुकता आहे, हे यावरुन दिसून येतं. यापूर्वी कुंदा ठाकरे या जाहीर कार्यक्रमांना दिसत नव्हत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्या ठाकरे कुटुंबांच्या महत्त्वाच्या प्रसंगी दिसल्या.

पुतण्याच्या शपथविधीला हजेरी

कुंदा ठाकरे या पुतण्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवेळी उपस्थित होत्या. 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावेळी शिवाजी पार्कातील या सोहळ्याला कुंदा ठाकरे उपस्थित होत्या. स्वत: राज ठाकरे हे आपल्या आईला घेऊन या शपथविधी सोहळ्याला आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी काकी आणि मावशी असलेल्या कुंदा ठाकरे यांचे पाया पडून आशीर्वाद घेतले होते.

राज ठाकरेंच्या ईडीभेटीवेळी

कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी (Kohinoor Square) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ईडीने नोटीस बजावली होती. ऑगस्ट 2019 मध्ये राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी झाली होती. त्यावेळी राज ठाकरे यांचे समर्थक त्यांच्या घराबाहेर जमले होते. राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले असताना त्यांना सोडण्यासाठी मातोश्री कुंदा ठाकरेही दरवाजापर्यंत आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते.

कुंदाताई ठाकरे  

कुंदाताई ठाकरे म्हणजे राज ठाकरे यांच्या मातोश्री. सध्या राज ठाकरेंची खरी ताकद म्हणून कुंदाताई लेकाच्या मागे भक्कमपणे उभ्या आहेत. ठाकरे घरण्यातील कौटुंबिक वाद असो की राज ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीतील चढउतार, कुंदाताई ठाकरे या सर्वांच्या साक्षीदार आहेत. कोणत्याही परिस्थितीत लेकाच्या मागे ठामपणे उभे राहणाऱ्या आईचं दर्शन, विविध प्रसंगी पाहायला मिळालं.

कुंदाताई ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वर्गीय मातोश्री मीनाताई ठाकरे या दोघी सख्ख्या बहिणी. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चुलत बंधू तर आहेतच, पण ते मावस भाऊही आहेत. त्यामुळे कुंदाताई यांना उद्धव ठाकरेंबद्दल आपुलकी आहेच.

संबंधित बातम्या 

Raj Thackeray : 9 तास चौकशी, फक्त हात जोडून राज ठाकरे रवाना