एकच इच्छा…राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचं देवाला साकडं, म्हणाले, त्यांच्यासारखा माणूस…
पुण्याच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो त्यांनी हटवला होता. त्यांच्या या कृतीमुळे राजकीय वाद रंगला होता. दरम्यान, आता याच अमित ठाकरे यांनी आपले वडील म्हणजेच राज ठाकरे यांच्यासाठी गणरायाकडे साकडे घातले आहे. राज ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्रिपद दे, अशी इच्छा अमित ठाकरेंनी गणरायाकडे व्यक्त केली आहे.

Amit Thackeray : मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे व्यासंगी नेते म्हणून ओळखले जातात. कला, साहित्य, क्रीडा ते राजकारण अशा सर्वच विषयांतील त्यांची जाण राज्यभरात चर्चेचा विषय असते. राजकीय, सामाजिक विषयांवर ते सतत भाष्य करत असतात. त्यांचे पुत्र अमित ठाकरे हेदेखील सध्या चर्चेत आहेत. पुण्याच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो त्यांनी हटवला होता. त्यांच्या या कृतीमुळे राजकीय वाद रंगला होता. दरम्यान, आता याच अमित ठाकरे यांनी आपले वडील म्हणजेच राज ठाकरे यांच्यासाठी गणरायाकडे साकडे घातले आहे. राज ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्रिपद दे, अशी इच्छा अमित ठाकरेंनी गणरायाकडे व्यक्त केली आहे.
राज ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री…
पुणे दौऱ्यावर असताना अमित ठाकरे यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी बोलताना त्यांनी गणरायाकडे काय साकडे घातले याची माहिती दिली. “राज ठाकरे यांच्यासारखा माणूस मुख्यमंत्रिपदावर असावा. कारण मला माहिती आहे तो माणूस काय काम करू शकतो. त्यांनी नाशिक शहरात खूप काम केलेलं आहे. ते नाशिक शहरात एवढं काम करू शकत असतील तर राज्यासाठीही खूप काही करू शकतात,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पेपर लिक होतायत. शेतकरी जीवन संपवतायत. लोक ट्रेनमधून पडून मरतायत. तो माणुस काय करु शकतो हे मला माहीत आहे. राज्यात सध्या अनेक अडचणी आहेत. या अडचणी राज ठाकरे दूर करू शकतात, असंही मत त्यांनी मांडलं.
तुम्ही अन्न खायचे बंद करा, असं…
सध्या राज्यात पावसाने दडी मारली आहे. अनेक ठिकाणी दुष्काळासारखी परिस्थिती आहे. परंतु दुष्काळ आढावा बैठकीत खासदार काजू, बदाम खाताना दिसले. यावरही अमित ठाकरेंनी मत व्यक्त केलं. तुम्ही अन्न खायचे बंद करा, असं आमचं मत नाही. तुम्हाला काय खायचे ते खा. पण जनतेचे प्रश्न सोडवा. रुममध्ये बसून तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न समजणार नाहीत. शेतकऱ्यांच्या घरात जा, असा सल्ला अमित ठाकरेंनी सरकारला दिला.
