Udayanraje Rajyasabha MP Oath | इंग्रजीतून शपथ घेऊन उदयनराजे म्हणाले, जय भवानी, जय शिवाजी, सभापतींकडून समज

| Updated on: Jul 22, 2020 | 1:10 PM

आठवले आणि उदयनराजेंनी इंग्रजी, शरद पवारांनी हिंदी, तर कराड, सातव, चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतली.

Udayanraje Rajyasabha MP Oath | इंग्रजीतून शपथ घेऊन उदयनराजे म्हणाले, जय भवानी, जय शिवाजी, सभापतींकडून समज
Follow us on

नवी दिल्ली : राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी राज्यसभा सदनात आज (22 जुलै) खासदारकीची शपथ घेतली. भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच खासदारकीची शपथ घेतली. इंग्रजीतून घेतलेल्या शपथेनंतर घोषणा दिल्याने उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना उदयनराजे यांना समज द्यावी लागली (Rajyasabha MP Udayanraje Bhosale took Oath in English)

“I Udayanraje Pratapsinhraje Bhosale…” अशी इंग्रजी भाषेत दमदार आवाजात शपथ घेण्यास उदयनराजेंनी सुरुवात केली. शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी “जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी” अशी घोषणा दिली.

“तुम्ही सदनात नवीन आहात, त्यामुळे सांगतो की हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल. सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या” अशा शब्दात व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली.

भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी आणि भाजपच्या भागवत कराड या महाराष्ट्रातील सहा खासदारांनी शपथ घेतली. आठवले आणि उदयनराजेंनी इंग्रजी, शरद पवारांनी हिंदी, तर कराड, सातव, चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतली.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

महाराष्ट्रातून सात जणांची मार्च महिन्यात खासदारपदी नियुक्ती झाली. त्यापैकी सहा जणांनी शपथ घेतली. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या उपस्थित नव्हत्या.

दुसरीकडे, मध्य प्रदेशात झालेल्या सत्तापालट नाट्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे, काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये सामील झालेले नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनीही खासदारकीची शपथ घेतली. तर काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांचाही शपथविधी झाला.

पहा व्हिडिओ :

महाराष्ट्राच्या कोट्यातील राज्यसभेच्या सात जागा 2 एप्रिलला रिक्त झाल्या. यात महाविकास आघाडीला 4 जागा मिळणार होत्या. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा निश्चित झाल्यानंतर चौथ्या जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच पाहायला मिळाली होती. अखेर राष्ट्रवादीने शरद पवारांशिवाय फौजिया खान यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं.

हेही वाचा : राज्यसभा खासदारांचा शपथविधी, उदयनराजेंची इंग्रजीत, पवारांची हिंदीत, चतुर्वेदींची मराठीत शपथ

राज्यसभेच्या उमेदवारीवरुन चारही प्रमुख पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळाली होती. भाजप पुरस्कृत रामदास आठवले यांच्याशिवाय पक्षाकडे दोन जागा होत्या. मात्र चर्चेतील नावांना मागे सारुन उदयनराजे भोसले आणि भागवत कराड यांना तिकीट देण्यात आले.

उदयनराजेंना सहा महिन्यात दुसऱ्यांदा तिकीट

उदयनराजे भोसले यांनी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपचा झेंडा हाती धरला होता. त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक लागली, परंतु पक्ष बदलणाऱ्या उदयनराजेंना मतदारांनी नाकारलं आणि राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांना संसदेत पाठवलं. उदयनराजे भोसलेंचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजपने त्यांना वरच्या सभागृहात पाठवण्याचा निर्णय घेतला

महाराष्ट्रातील सात खासदार

  1. उदयनराजे भोसले – भाजप
  2. भागवत कराड – भाजप
  3. रामदास आठवले – भाजप पुरस्कृत
  4. शरद पवार – राष्ट्रवादी
  5. फौजिया खान – राष्ट्रवादी
  6. राजीव सातव – काँग्रेस
  7. प्रियांका चतुर्वेदी – शिवसेना

(Rajyasabha MP Udayanraje Bhosale took Oath in English)