शिंदे गटाचे आमदार फोडणार काय?; रावसाहेब दानवे यांचं खास स्टाईलमध्ये एका वाक्यात उत्तर

| Updated on: Oct 27, 2022 | 12:15 PM

भारतीय जनता पक्ष कोणत्याही राजकीय पक्ष फोडणार नाही. शिवसेनेने आम्हाला धोका दिला. पण आम्ही त्यांचेही आमदार फोडले नाही. शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली.

शिंदे गटाचे आमदार फोडणार काय?; रावसाहेब दानवे यांचं खास स्टाईलमध्ये एका वाक्यात उत्तर
शिंदे गटाचे आमदार फोडणार काय?; रावसाहेब दानवे यांचं खास स्टाईलमध्ये एका वाक्यात उत्तर
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जालना: केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) गेल्या काही दिवसांपासून बरेच फॉर्मात आहेत. दानवे यांची गेल्या काही दिवसांपासून जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. प्रत्येक राजकीय प्रश्नांवर दानवे यांची फटकेबाजी सुरू असते. मग कोणताही प्रश्न असो दानवे यांचं उत्तर तयारच असतं. आजही त्यांना असाच एक अडचणीचा प्रश्न विचारण्यात आला. शिंदे गटाच्या (shinde camp) संदर्भातील प्रश्न त्यांना विचारण्यात आला. पण या प्रश्नावर उत्तर देणार नाहीत ते रावसाहेब दानवे कसले? त्यांनीही आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. त्यामुळे पत्रकारांना (media) उत्तर तर मिळालंच, पण म्हणावी तशी बातमी मिळाली नाही.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना भाजप शिंदे गटाचे आमदार फोडणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर दानवे यांनी शांतपणे उत्तर दिलं. भाजप शिंदे गटाचा एकही आमदार फोडणार नाही. कारण आम्ही एकत्र आहोत, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. आम्ही एकत्र आहोत म्हणून आमदारा फोडणार नाही, असं विधान केल्याने पत्रकारांच्याही भुवया उंचावल्या गेल्या.

हे सुद्धा वाचा

भारतीय जनता पक्ष कोणत्याही राजकीय पक्ष फोडणार नाही. शिवसेनेने आम्हाला धोका दिला. पण आम्ही त्यांचेही आमदार फोडले नाही. शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली. आम्ही शिवसेनेला पाडले नाही. परंतु त्यांच्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे ते पडले, असं त्यांनी सांगितलं.

विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यावरही दानवे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढली. त्यांच्याकडे संख्याबळ आले अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यांच्याकडे संख्याबळ आहे, असं ते म्हणाले.

अर्जुन खोतकर आणि माझ्यामधील कटुता संपली आहे. मीडियाने आमच्यात आता भांडणे लावू नये. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत. कारण त्यांना अस्तित्व टिकवायचे आहे, असं त्यांनी सांगितलं.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे. नुकसानीचा आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन मदत केली जाणार आहे. त्याबाबत केंद्राला कळवले जाईल आणि शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

गुलाबराव पाटील आणि चिमणराव पाटील तसेच रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये जो वाद होत आहे, त्या संदर्भात मी त्यांना फोन करणार आहे. त्यांच्याकडून माहिती घेऊन तुमच्याशी बोलेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.