रत्नागिरी-सिंधुदुर्गातल्या उमेदवाराचा 100 रुपयांच्या बाँडवर जाहीरनामा

  • मनोज लेले, टीव्ही 9 मराठी, रत्नागिरी
  • Published On - 15:39 PM, 8 Apr 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्गातल्या उमेदवाराचा 100 रुपयांच्या बाँडवर जाहीरनामा

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामाला सुरवात झाली आहे. मतदार राज्याला आपल्या पक्षाला मतदान करण्यासाठी विविध पक्ष आकर्षक असे वचननामे जाहिरनामे प्रकाशित करत आहेत. मात्र या लोकसभेच्या कुंभमेळ्यात असा एक उमेदवार आहे, ज्याने चक्क प्रतिज्ञापत्रावर वचननामा प्रसिद्धा केला आहे. निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असणाऱ्या या अवलिया उमेदवाराने चक्क 100 रुपयांच्या बॉण्ड पेपरवर, आपण निवडून आलो तर काय करु, याचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. एखाद्या उमेदवारांनी अशाप्रकारे नोटरी करुन जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची ही या लोकसभा निवडणुकीतील पहिलीच घटना आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार संजय गांगनाईक रिंगणात आहेत. सध्या लोकसभेच्या महाकुंभमेळ्यात गंगानाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झालीय. अनेक राष्ट्रीय पक्ष नेहमीच वचनामा किंवा जाहीरनामे प्रसिद्ध करतात. मात्र गांगनाईक यांनी जाहीर केलेला वचननामा काहीसा हटके आहे.

पेशाने वकील असलेल्या संजय गांगनाईक यांनी चक्क 100 रुपयांच्या शपथपत्रावर म्हणजे बॉण्ड पेपरवर वचननामा प्रसिद्ध केलाय.

वचननाम्यात गांगनाईक यांनी काय म्हटलंय?

  • दिवस-रात्र जनतेच्या प्रश्नांसाठी काम करेन
  • स्वार्थांसाठी विशेष सवलत उपभोगणार नाही
  • संसदीय हिशेब वेळच्या वेळी जनतेला देईन
  • प्रत्येक महिन्यात एकदा तरी मतदार संघातील एका तालुक्याला भेट देईल
  • केंद्रात येईल त्या सत्ताधारी पक्षाला विनाअट पाठिंबा देईन
  • जनतेनी आणलेली विधायक कामे पूर्ण करेन

जवळपास 10 विविध प्रकारचे वचननामे शपथपत्रावर देण्यात आलेत. जाहीर करण्यात आलेला वचननामा नोटरी करण्यात आला आहे. राजकीय आश्वासनावर जनतेचा विश्वास राहिला नसल्याने आपण वचननाम शपथपत्रावर दिला असल्याचं गांगनाईक सांगतात.

या अनोख्या वचननाम्याचं अनेक मतदारांनी स्वागत केलंय. राजकीय पुढारी आपले रंग सतत बदलत असतात. त्यामुळे अशा प्रकारचे वचननामे राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा काढणे बंधनकारक करण्यात यावे, यासाठी निवडणूक आयोगाने आपल्या नियमात बदल करावा अशी मागणी मतदारराजा करतोय.

शपथपत्रावर सादर केलेला वचननामा पूर्ण न केल्यास कायद्याने कारवाई होऊ शकते. मात्र संजय गांगनाईक यांनी हा शंभर रुपयांच्या बॉण्डवर केलेला जाहीरनामा आपल्यापाशी ठेवलाय. त्यामुळे उद्या हे उमेदवार महाशय जिंकले तर तो बॉण्ड त्यांच्यापाशी राहणार आहे. त्यामुळे संजयरावांनी केलेला वचननामा हुशारीचा असला तरी तो हुशारीनं आपल्यापाशी ठेवून वेगळी चलाखी दाखवलीय. पण वचननामे आणि जाहीरनामे काढताना त्यावर अंकुश ठेवण्याची गरज आज भासतेय हेच यातून सूचित होताना पाहायला मिळत आहे.