विनयभंग होतो तर गर्दीच्या ठिकाणी जाताच कशाला?; जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीची संतप्त प्रतिक्रिया

| Updated on: Nov 14, 2022 | 10:45 AM

त्या कार्यक्रमात भाजपचं कोण होतं? एक नाव तरी सांगा. उपमुख्यमंत्री आले नाही, त्यामुळे भाजपचे कार्यकर्तेही तिकडे नव्हते. मग भाजपची कार्यकर्ती मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर गुन्हा दाखल कशी करते?

विनयभंग होतो तर गर्दीच्या ठिकाणी जाताच कशाला?; जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीची संतप्त प्रतिक्रिया
जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीची संतप्त प्रतिक्रिया
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ठाणे: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपच्या महिला मोर्चाच्या एका पदाधिकारी महिलने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्याचे संतप्त पडसाद उमटले आहेत. या सर्व प्रकारावर आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्या महिलेने आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला. ती महिला आधीच जामिनावर आहे. तसेच आव्हाड यांनी कार्यक्रमात ढकलल्यानंतर चार तासाने तुम्हाला ढकलल्याची जाणीव होते काय? असा सवाल करतानाच विनयभंग होतो तर मग गर्दीच्या ठिकाणी जाताच कशाला? असा संतप्त सवाल ऋता आव्हाड यांनी केला आहे.

ऋता आव्हाड यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना हा संतप्त सवाल केला आहे. गुन्हा दाखल करणारी महिला भाजपच्या पदाधिकारी आहेत का? त्या कधी भाजपच्या तर कधी राष्ट्रवादीच्या स्टेजवर असतात. छठपुजेच्यावेळी मुंब्र्यात टेन्शन होतं. या महिलेने त्यावेळी बाचाबाची केली होती. काही कारण नसताना बोंबाबोंब केली होती.

हे सुद्धा वाचा

कारण नसताना त्यावेळी तिने आव्हाडांवर अर्वाच्य भाषेत कमेंट केली होती. त्यामुळे या महिलेच्या विरोधात गुन्हे दाखल असून ती आणि तिची मुलगी जामिनावर आहे. ती केस अजूनही सुरू आहे. त्यामुळे आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा तिच्याकडे मोटीव्ह आहे, असं ऋता आव्हाड म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दी होती. सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त होता. अशा ठिकाणी कुणी कुणाला बाजूला केलं तरी कुणाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे या महिलेलाही गर्दीमुळे खांद्याला धरून बाजूला केलं असेल. पण चार तासानंतर आपल्याला बाजूला केलं याची या महिलेला जाणीव कशी झाली? चार तासानंतर गुन्हा दाखल करण्याचं कारण काय? हा काय पोरकटपणा आहे, असा संताप ऋता आव्हाड यांनी व्यक्त केला.

आव्हाड हे निवडणुकीला उभे राहिले हा त्यांचा निर्णय होता. राजीनामा देणं हा निर्णय सुद्धा त्यांचाच असेल. मी त्यावर बोलणार नाही. पण त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मुंब्रा-कळव्यात प्रचंड अराजक निर्माण होईल. कोणी तरी रुपयावाला. एक रुपये चाळीस पैशावाला व्यक्ती एखाद्या माणसाला त्रास देत असेल आणि सरकार अशा लोकांना मदत करत असेल तर ते चुकीचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

सार्वजनिक ठिकाणी कसं वागलं पाहिजे हे मलाही कळतं. कालच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दी होती. तिथे आमच्या कार्यकर्त्याही खाली पडल्या. मग त्यांनी गुन्हा दाखल करायचा का? आम्हाला मारहाण झाली असं आमच्या कार्यकर्त्यांनी म्हणायचं का? तुमचा विनयभंग होतो तर गर्दीत जाऊ नका. कोणी तुम्हाला जायला सांगितलं? असा सवाल त्यांनी केला.

त्या कार्यक्रमात भाजपचं कोण होतं? एक नाव तरी सांगा. उपमुख्यमंत्री आले नाही, त्यामुळे भाजपचे कार्यकर्तेही तिकडे नव्हते. मग भाजपची कार्यकर्ती मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर गुन्हा दाखल कशी करते? हे चाललंय काय? कायद्याशी खेळलं जात आहे. ही कलम त्यासाठीच आहे का? असा सवाल त्यांनी केला.

माझा अंगुलीनिर्देश हा कायद्याचा आणि बळाचा गैरवापर होत आहे त्याकडे आहे. जो कोणी करत असेल त्याच्याकडे माझा अंगुलीनिर्देश आहे. कोण करतंय हे कोणामुळे होतंय हे अत्यंत वाईट आहे. हे अति झालं, मर्यादा ओलांडली जात आहे, असंही त्या म्हणाल्या.