शरद पवारांना संकटकाळी जाग असतेच, विरोधकांनी बोंब मारुन पोट आणि घसा दुखवू नये, सामनातून भाजपवर टीका

| Updated on: Jun 11, 2020 | 8:02 AM

भाजप नेते चंद्रकांत पाटील, दुखणारे पोट नुसतेच शेकत बसा," अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. (Saamana Editorial Criticizes BJP Chandrakant Patil) 

शरद पवारांना संकटकाळी जाग असतेच, विरोधकांनी बोंब मारुन पोट आणि घसा दुखवू नये, सामनातून भाजपवर टीका
Follow us on

मुंबई : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना संकटकाळी जाग असतेच. तेव्हा उगाच विरोधकांनी बोंब मारून स्वत:चेच पोट आणि घसा दुखवून घेऊ नये. ‘निसर्ग’ वादळात ‘बाम’च्या डब्याही उडून गेल्या आहेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील, दुखणारे पोट नुसतेच शेकत बसा,” अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्राच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. (Saamana Editorial Criticizes BJP Chandrakant Patil)

“पश्चिम बंगालमध्ये वादळ आणि महाराष्ट्रात फक्त गार वारे सुटले अशी स्थिती नाही. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन-पाच हजार कोटींची मदत घेऊन महाराष्ट्रात का पोहोचले नाहीत? आणि चंद्रकांत पाटलांनीही केंद्राला का जागे केले नाही?” असा सवालही सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

“महाराष्ट्रात किमान साडेचार वर्षे विधानसभा निवडणूक होत नाही. पुन्हा त्यानंतरही भाजपला येथे सत्ता मिळणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांनी काहीकाळ झोपलेलेच बरे,” असा सल्लाही सामनातून भाजपला देण्यात आला आहे.  (Saamana Editorial Criticizes BJP Chandrakant Patil)

भाजपचे नेते राजकारणग्रस्त

“संपूर्ण देश कोरोनाग्रस्त झाला आहे हे सत्य, पण महाराष्ट्रातील भाजपचे पुढारी कोरोना आणि निसर्ग वादळ असे बेकाबू संकट कोसळलेले असूनही कमालीचे राजकारणग्रस्त झाले आहेत. त्यांची कीव करावी तेवढी थोडीच. निसर्ग वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कोकणी जनतेला दिलासा देण्यासाठी शरद पवार हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही रायगडचा छोटेखानी दौरा केला. ते पुन्हा एकदा तेथे जातील असे दिसते.”

“निसर्ग वादळाचा सर्वात जास्त तडाखा अलिबाग, रेवदंडा, चौल, नागाव, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, दिवेआगर अशा भागांना बसला. नुकसानीचे पंचनामे सुरू होण्याआधीच सरकारने तातडीची मदत जाहीर केली. आता शरद पवार हे त्यांच्या पद्धतीने लोकांना भेटून नुकसानीची, मदत कार्याची माहिती घेण्यासाठी पोहोचले. यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दुखणाऱ्या पोटावर डावा हात दाबत उजवी मूठ तोंडावर ठेवून बोंब मारली आहे. ‘‘शरद पवारांना आता जाग आली का?’’ असा उटपटांग सवाल पाटलांनी करावा हे त्यांच्या स्वभावास धरूनच आहे,” असा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.

शरद पवार योग्य वेळ साधतात

“कोणी चांगले, महाराष्ट्रहिताचे काम करीत असेल व कोथरूडच्या उपऱ्या पाटलांनी बोंब मारली नाही असे सहसा घडत नाही. त्यामुळे पवार, ठाकरे बाहेर पडताच सवयीस जागून त्यांनी बोंब मारली. पाटील अशावेळी अचूक वेळ साधतात. शरद पवारांना आता जाग आली का, हा त्यांचा सवाल आहे. शरद पवार नेहमीच जागे असतात. त्यामुळे राजकारणात ते योग्य वेळ साधतात. असे देशाचा राजकीय इतिहास सांगतो. भाजपचे नेते सहा महिन्यांपूर्वी मध्यरात्रीच जागे झाले. त्यांनी राजभवनात पहाटे शपथ सोहळे केले, पण पवारांनी दोन दिवसांत धोबीपछाड दिल्याने गेल्या सहा महिन्यांपासून भाजपवाले झोपलेलेच नाहीत.”

“वाजपेयींपासून आज मोदींपर्यंत प्रत्येकजण अशा प्रश्नी पवारांशी सल्लामसलत करूनच निर्णय घेत आले आहेत. पण पाटील व त्यांचे लोक ‘‘पवारांना आता जाग आली काय?’’ असे विचारून एकप्रकारे वाजपेयी-मोदींचाच अपमान करीत आहेत,” असेही अग्रलेखात म्हटलं आहे.

“सांगलीच्या महापुरात पाटलांचे सरकार किती व कसे जागे होते याचा अनुभव जनतेने घेतला आहे. त्यावेळचे सरकार जागे राहून पुरात फक्त सेल्फी काढण्यात दंग होते. त्यामुळे पूरग्रस्त इतके खवळून उठले की, भाजपच्या मंत्र्यांना त्यांनी जागोजागी अडवून जाब विचारला होता. शेवटी या सगळ्यांना जनतेने घरी बसवले. पवारांना जाग आली की नाही याचा निकाल राज्याची जनता देईल, पण संकटकाळात महाराष्ट्राला भरघोस मदत करावी यासाठी केंद्राला जाग आली आहे काय?” असा प्रश्न सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.  (Saamana Editorial Criticizes BJP Chandrakant Patil)

संबंधित बातम्या :

Oxford सारख्या विद्यापीठांनी परीक्षा रद्द केल्या, पण आपल्या राज्यपालांचं ज्ञान मोठं : शरद पवार

महाविकास आघाडी सरकार आता सुप्रीम कोर्टाला महाराष्ट्रविरोधी ठरवणार का? : देवेंद्र फडणवीस