खोका, मोका आणि धोका! गद्दार म्हणत शिवसेनेचं मुखपत्र सामनाकडून एक ‘बिहारी बाण’

| Updated on: Aug 27, 2022 | 7:25 AM

Saamana Editorial: महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असलेले 50 खोके सध्या देशाच्या राजकारणातही चर्चेचा विषय बनले आहेत. यावर आजच्या सामनातून टीका करण्यात आली आहे.

खोका, मोका आणि धोका! गद्दार म्हणत शिवसेनेचं मुखपत्र सामनाकडून एक बिहारी बाण
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असलेले 50 खोके सध्या देशाच्या राजकारणातही चर्चेचा विषय बनले आहेत. यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या अग्रलेखातून (Saamana Editorial)  भाष्य करण्यात आलं आहे. “मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी जाहीरपणे सांगितले आहे की, ‘महाराष्ट्रातील खोक्यांचा फॉर्म्युला वापरून ‘आप’चे आमदार विकत घेण्याचा प्रकार सुरू झाला आहे.’ म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसलेल्या खोकेवाल्यांचा उद्धार झालाच. बिहारात राजद-जदयुचे नेते जाहीरपणे बोलत आहेत, ‘महाराष्ट्र में जो खोकेवाली राजनीती हुई, वो बिहार (Bihar Politics) में फेल हो गयी!’ पायरीवरच्या खोकेवाल्यांनी हे नीट समजून घ्यावे. गद्दारीचे दुसरे नाव खोकेवाले पडले आहे. महाराष्ट्राला हा कलंकच लागला म्हणायचा. जगाच्या पाठीवर ‘बोको हराम’ नावाची एक बदनाम संघटना आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘खोके हराम’ नावाची संघटना उदयास आली आहे. त्यात बोकेही आहेत आणि खोकेही आहेत. हरामखोरी हाच त्यांचा धर्म आहे. ‘खोके हरामां’चे अस्तित्व फार काळ राहणार नाही, हे मात्र नक्की!”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

खोका, मोका आणि धोका!

महाराष्ट्रात गुरुवारी विधानसभा अधिवेशनाचे सूप वाजले. हे पावसाळी अधिवेशन होते. राज्यात यंदा पाऊसही तुफान झाला आहे, पण विरोधकांनी मागणी करूनही सरकार ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाही. कारण येथे सर्व सत्ताभोगी असून जनहिताच्या बाबतीत त्यांच्या अकलेचाच दुष्काळ पडला आहे. हा अकलेचा दुष्काळ शेवटचे दोन दिवस सभागृहातून विधानसभेच्या पायऱयांवर आला. पण खोकेछाप शिंदे गटाचा खरा चेहरा उघड झाला. पूर्वी तालेवार लोकांना रावसाहेब, रावबहादूर वगैरे उपाध्या लावल्या जात. पण शिंदे गटाच्या लोकांपुढे म्हणजे त्यांनी चोरलेले जे आमदार वगैरे मंडळी आहेत, त्यांच्या आडनावापुढे यापुढे वंशपरंपरेने ‘खोकेवाले’ ही उपाधी लागेल. अगदी सहज सोप्या भाषेत हा विषय समजवायचा तर ‘दिवार’ चित्रपटात अमिताभ बच्चन याच्या हातावर कोरले होते, ‘मेरा बाप चोर है!’ त्याच पद्धतीने या चोरांच्या पुढच्या पिढीच्या कपाळावर कोरले जाईल, ‘मेरा बाप, भाई, आजोबा खोकेवाला था ! आणि त्याने महाराष्ट्राशी, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली!’ हा शिक्का पुसता येणे कठीण आहे. ही सल मनात टोचत असल्यामुळेच दोन दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार सभागृह सोडून विधानसभेच्या पायऱयांवर बसले व आम्ही

‘खोकेवाले नाही. आम्हाला खोकेवाले म्हणू नका’ असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत राहिले. अमरावतीमधील दोन आमदारांत तर खोके प्रकरणावरून चांगलीच जुंपली. रवी राणा विरुद्ध बच्चू कडू यांच्यातील कलगीतुऱयाने चोर कोण व खोकेवाले कोण याचा पर्दाफाश झाला. रवी राणा महाशयांनी बच्चू कडू यांच्यावर त्यांच्याच गावात जाऊन प्रहार केला. ते म्हणाले, ‘जिथे पैसा तिथे बच्चू कडू. बच्चूसाठी बाप बडा न भय्या, सबसे बडा रुपय्या!’ रवी राणा म्हणतात, ‘मी गुवाहाटीला जाऊन सौदेबाजी करणारा आमदार नाही.’ रवी राणा हे सत्ताधारी पक्षाचे व देवेंद्र फडणवीस यांच्या आतल्या गोटातील आमदार आहेत. ते रोज उठून हनुमान चालिसाचे पठण करतात. त्यामुळे त्यांना सत्य बोलण्याची प्रेरणा व बळ मिळत असावे. शिवाय रवी राणा यांनी जे हनुमान चालिसा आंदोलन सुरू केले त्यामुळे महाराष्ट्रातील खोकेवाल्या कौरवांच्या बाबतीत त्यांच्या मनात राग निर्माण झाला असावा. राणा यांनी मनी सत्याची चाड धरून बच्चू कडू खोकेवाला यांच्यावर जो हल्ला केला, त्यामागे त्यांच्या वरिष्ठांचीच प्रेरणा असावी. महाराष्ट्राची जेवढी बदनामी या खोके प्रकरणाने केली तेवढी आतापर्यंत कोणीच केली नसेल. शिंदे गटातील सर्व कडू, गोड, आंबट, तिखट, तुरट हे खोक्यांच्या नादी लागले. पण नाव महाराष्ट्राचे बदनाम झाले.

हे सुद्धा वाचा

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खोकेवाले आमदार पुन्हा विधानसभेच्या पायऱ्यांवर बसले. त्यांनी अंगावर चित्रविचित्र पोस्टर्सचे कपडे घालून होळीची सोंगं आणली. त्यांचे वर्तन आणि हावभाव अत्यंत विचित्र व उबग आणणारे होते. फक्त पाठीमागे शेपटी लावून माकडउड्या मारायचेच काय ते बाकी होते. आपण आता सत्ताधारी बाकांवर आहोत व विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या ‘खोका’ पक्षाचे महनीय सदस्य आहोत. सत्ताधारी बाकांवर बसून आपणास लोकहिताची, राज्याच्या कल्याणाची कामे पुढे रेटायची आहेत हे खरे म्हणजे त्यांच्या लक्षात राहायला हवे. मात्र त्याचाच विसर या मंडळींना पडावा, हे त्यांच्या चारित्र्यास साजेसे आहे. विधिमंडळाच्या पायऱयांवर बसलेल्या खोका आमदारांचे हे विचित्र चाळे मुख्यमंत्री स्वतः पाहत होते व त्यांनी या आमदारांना भल्याच्या चार गोष्टी सांगितल्या नाहीत.

आडातच नाही तेथे पोहोऱ्यात कोठून येणार? हाच प्रश्न आहे. त्या खोका आमदारांचा माकडखेळ पाहत आपले मुख्यमंत्री उभे राहिले व खोकेवाल्यांची कहाणी सफल झाली. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. पावसाने राज्यात हाहाकार माजला आहे. दहीहंडीच्या खोकेवाले पुरस्कृत खेळाने अनेक गोविंदांचा मृत्यू झाला आहे, पण सत्ताधारी पक्षाचे ‘खोकेवाले गोविंदा’ विधानसभेच्या पायरीवर बसून हाणामारी करीत राहिले. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचे व स्वाभिमानाचे हे असे मातेरे झाले. राज्याच्या रस्त्यांवर आज फक्त खड्डे आहेत. त्या खड्डय़ांचे रस्ते कधी होणार? मुख्यमंत्री म्हणतात, सर्व रस्ते सिमेंटचे करू. कराल तेव्हा कराल. पण सध्या महाराष्ट्र खड्डय़ात व आमदार खोक्यांत फसले आहेत. महाराष्ट्रात व बाहेर जेथे जावे तेथे लोक खोकेवाल्यांच्या नावाने बोंब मारीत आहेत. दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी जाहीरपणे सांगितले आहे की, ‘महाराष्ट्रातील खोक्यांचा फॉर्म्युला वापरून ‘आप’चे आमदार विकत घेण्याचा प्रकार सुरू झाला आहे.’ म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पायऱयांवर बसलेल्या खोकेवाल्यांचा उद्धार झालाच.

बिहारात राजद जदयुचे नेते जाहीरपणे बोलत आहेत, ‘महाराष्ट्र में जो खोकेवाली राजनीती हुई, वो बिहार में फेल हो गयी!’ पायरीवरच्या खोकेवाल्यांनी हे नीट समजून घ्यावे. सर्वत्र खोकेवाल्यांचीच धामधूम आहे. गद्दारीचे दुसरे नाव खोकेवाले पडले आहे. महाराष्ट्राला हा कलंकच लागला म्हणायचा. जगाच्या पाठीवर ‘बोको हराम’ नावाची एक बदनाम संघटना आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘खोके हराम’ नावाची संघटना उदयास आली आहे. त्यात बोकेही आहेत आणि खोकेही आहेत. हरामखोरी हाच त्यांचा धर्म आहे. ‘खोके हरामां’चे अस्तित्व फार काळ राहणार नाही, हे मात्र नक्की!