दिल्लीत सुकलेल्या तलावात भाजपचं ‘कमळ’, काँग्रेसचं अस्तित्व नाही, केजरीवालांवर ‘सामना’तून स्तुतिसुमनं

| Updated on: Feb 07, 2020 | 7:55 AM

केजरीवाल यांनी मागच्या पाच वर्षात केलेल्या कामांवर मतं मागितली आहेत. देशाच्या राजकारणात हा वेगळा प्रयोग आहे, असं म्हणत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं सामनातून कौतुक करण्यात आलं आहे.

दिल्लीत सुकलेल्या तलावात भाजपचं कमळ, काँग्रेसचं अस्तित्व नाही, केजरीवालांवर सामनातून स्तुतिसुमनं
Follow us on

मुंबई : दिल्लीत काँग्रेसचं अस्तित्व फारसं उरलेलं नाही. भाजप सुकलेल्या तलावात कमळ फुलवीत आहे. एक केजरीवाल सगळ्यांना लय भारी पडताना दिसत आहेत, अशा शब्दात शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर स्तुतिसुमनं (Saamana Praises Arvind Kejriwal) उधळण्यात आली आहेत.

‘दिल्लीत काँग्रेसचं अस्तित्व फारसं उरलेलं नाही. भाजप सुकलेल्या तलावात कमळ फुलवीत आहे. त्यांच्या या नव्या फुलोत्पादनाला आमच्या शुभेच्छा. पण केजरीवाल यांनी मागच्या पाच वर्षात केलेल्या कामांवर मतं मागितली आहेत. देशाच्या राजकारणात हा वेगळा प्रयोग आहे. राजकीय मतभेदांच्या पलिकडे जाऊन या प्रयोगाचे स्वागत केले पाहिजे. एक केजरीवाल
सगळ्यांना लय भारी पडताना दिसत आहेत. दिल्लीचे मतदार सूज्ञ झाले आहेत. त्यांना शहाणपणाचे डोस पाजण्याची गरज नाही.’ असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

महाराष्ट्र हातचे गेले, झारखंडमध्ये दारुण पराभव झाला, त्यामुळे दिल्लीत तरी झेंडा फडकवावा, असं भाजपला वाटल्यास चुकीचं काय? असं म्हणत शिवसेनेने टोला लगावला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी 200 खासदार, भाजपचे सर्व मुख्यमंत्री, संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ कामाला लागले आहे, पण इतकं करुनही एक केजरीवाल सगळ्यांना भारी, असं चित्र स्पष्ट झाल्याचंही अग्रलेखात म्हटलं आहे.

एखाद्या राज्यात कोणी चांगलं काम करत असेल, आणि ते राज्य आपल्या विचाराचे नसेल, तरीही चांगल्याला चांगले म्हणणे आणि ते काम पुढे घेऊन जाणे, हे देशाच्या लोकनायकाचे काम असते, पण ही मनाची दिलदारी आज उरली कुठे? असा प्रश्न सामनातून विचारण्यात आला आहे.

याआधी, अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या वेळीही ‘सामना’तून निषेध व्यक्त करण्यात आला होता. शाईफेक किंवा बूटफेक हा कोणत्याही राजकीय समस्येवर तोडगा असू शकत नाही, असं 2019 मधील अग्रलेखात (Saamana Praises Arvind Kejriwal ) म्हटलं होतं.