एकनाथ शिंदे हे अमित शाहांच्या त्या षडयंत्राचा भाग, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, मोदीनंतर भाजपचा…
संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे की, एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मोठ्या षडयंत्राचा भाग आहेत. शाह यांना मोदींनंतर पंतप्रधान व्हायचे असून, त्यासाठीच ते खासदारांची फोडाफोडी करत आहेत. राऊत म्हणाले की, शाह अराजक निर्माण करत आहेत आणि शिंदेंना वापरून मोदींविरोधात बंड करण्याची तयारी करत आहेत.

शिवसेनेसह टीएमसीमध्ये झालेल्या खासदार फुटीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच जबाबदार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. खासदारांची महाराष्ट्रातही फोडाफोडी सुरू आहे. शाह यांचं हे मोठं षडयंत्र आहे. या षडयंत्राचा एकनाथ शिंदे एक भाग आहेत. शाह यांना पंतप्रधान व्हायचं आहे. त्यासाठीच हा प्रकार सुरू आहे. उद्या शाह हे मोदींविरोधात बंड करू शकतात, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना मोठे गौप्यस्फोट केले. देशात गोंधळ नाही तर अराजक निर्माण होणार आहे. अराजक होईल. अमित शाहा हे व्यापारी आहेत. शेअरमध्ये पैसा गुंतवणे आणि कुत्रिम भाव वाढवून पैसा कमावणे हा त्यांचा मूळ व्यवसाय आहे. बाकी सहकार हे ढोंग आहे. त्यांनी या देशात अराजक निर्माण करण्याची सुपारी घेतली आहे. कुणाची घेतली हे भविष्यातील काळ ठरवेल. खासदार, प्रादेशिक पक्ष फोडून भविष्यात मोदींना आव्हान देण्याचं षडयंत्र आहे. मोदींना आव्हान देण्याच्या षडयंत्रात एकनाथ शिंदेंना शामिल करून घेतले. या खासदारांच्या विरोधात उद्या शाह मोदींविरोधात बंड करून घेऊ शकतात, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
भाजपचा पंतप्रधान होणार नाही
एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन अमित शाह यांना मोदींसमोर आव्हान तयार करायचं आहे. मोदींनंतर भाजपचा कोणीच पंतप्रधान होणार नाही, असा दावा करतानाच शिंदेंच्या पक्षाला शाह शिवसेना म्हणत असतील तर त्यांना शेयर बाजारात जावं लागेल. आमचीच शिवसेना असली आहे. हिंमत असेल तर शाह यांनी कोर्टात जावं आणि कोर्टा समोर सांगावं मी गृहमंत्री आहे. असली शिवसेना ठाकरेंची नाही. शिंदेंची आहे, असं आव्हानच राऊत यांनी दिलं.
पोटातलं विष ओठावर आलं
एकनाथ शिंदे ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी आहे. शिंदेंच्या गटाला चार वर्ष झाली आहेत. सुप्रीम कोर्ट चार वर्ष निर्णय देऊ शकला नाही. तुमच्या दबावामुळे. सुप्रीम कोर्टाचा अधिकार घेऊन शिवसेना कोणती हे तुम्ही सांगितलं. यावरून सुप्रीम कोर्ट तुमच्या दबावामुळे निर्णय देत नाही हे स्पष्ट होतंय. तुमच्या दबावामुळेच आयोगाने त्यांना चिन्ह दिलं. काल ते म्हणाले, अमित शाहांच्या पोटातील विष ओठावर आलं. शिंदे हे शिवसेना प्रमुख आहेत हे अमित शाह यांनी सांगितलं. शिवसेना प्रमुखांची जागा घेण्याची प्रेरणा शाह यांनी शिंदेंना दिली, असंही ते म्हणाले.