अजित पवार स्टेपनी, आमची गाडी घसरणार नाही : संजय राऊत

| Updated on: Jan 15, 2020 | 2:58 PM

अजित पवार स्टेपनी आहेत, स्टेपनीसुद्धा महत्त्वाची असते. स्टेपनी नसेल तर लांबचा प्रवास करता येऊ शकत नाही, असं संजय राऊत म्हणाले

अजित पवार स्टेपनी, आमची गाडी घसरणार नाही : संजय राऊत
Follow us on

मुंबई : आमची गाडी घसरणार नाही याची आम्हाला खात्री होती, सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेच योग्य आहेत, तर अजित पवार स्टेपनी आहेत, असं म्हणत ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी हशा पिकवला. अजूनही मला पत्रकार म्हणवून घेणं पसंत आहे, नेता आणि खासदार नाही, माझी तीच ओळख कायम असावी, असं राऊत म्हणाले. ‘लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्या’त संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली, तेव्हा ते (Sanjay Raut says Ajit Pawar is Stepney) बोलत होते.

आम्हाला राज्य चालवण्याचा उत्तम अनुभव आहे. पुढल्या पाच वर्षात काय करायचं हे आमचं ठरलं आहे. शरद पवार यांनी आदर्श सरकार चालवायचं ठरवलं होतं. प्रत्येकाच्या इच्छेतून हे सरकार निर्माण झालं आहे. पडद्यामागच्या गोष्टी पडद्यामागे राहू द्या, असंही संजय राऊत म्हणाले. कोणतंही खातं कमी जास्त महत्वाचं नसतं, सर्व खाती महत्वाची असतात, आम्ही खाणारी खाती आमच्याकडे घेतलीच नाहीत, अशी कोपरखळीही राऊतांनी दिली.

आमची गाडी घसरणार नाही याची आम्हाला खात्री होती, सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेच योग्य आहेत, तर अजित पवार स्टेपनी आहेत, स्टेपनीसुद्धा महत्त्वाची असते. स्टेपनी नसेल तर लांबचा प्रवास करता येऊ शकत नाही. अजित पवारांना घेऊन गेले त्यावेळी मला काहीच वाटलं नाही, मी निर्ढावलेला माणूस आहे. अजित पवारांनी त्यांच्या गाडीचे नट काढण्याचे काम केलं, असं राऊत म्हणाले.

मी कोणालाही घाबरत नाही. मी मारामाऱ्याही करुन आलेलो आहे. हिंमत असेल तर कुणालाही घाबरायची गरज नाही, मग पंतप्रधान असो की अजून कुणी, मी त्या काळात दाऊद इब्राहिमलाही दम दिला होता, असं राऊत म्हणाले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी करिम लाला याची भेट घेण्यासाठी यायच्या, असा दावाही संजय राऊत यांनी केला मुलाखत चांगली व्हावी असं जर वाटत असेल तर समोरचा माणूस चिडला पाहिजे, असा सल्लाही राऊतांनी यावेळी दिला.

मकरसंक्रांतीला आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या भेटीला, राजकीय ‘पतंगबाजी’ला उधाण

हे सरकार म्हणजे सुपरहिट सिनेमा आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाने या सिनेमाचा आस्वाद घ्यावा, आम्ही उत्तम अशी कलाकृती बनवली आहे. विरोधी पक्षाने ती भूमिका उत्तम वठवली नाही तर ते चरित्र नायक होतील, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

महाराष्ट्रात मजबूत विरोधी पक्ष आहे. सरकारला एक वर्ष काम करु द्या. सरकार काम करतं, तेव्हा चुका होतात. विरोधीपक्ष हा लोकशाहीतील महत्त्वाचा घटक आहे. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना उत्तम बळ दिलं पाहिजे, असं मतही संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

बाळासाहेब ठाकरे माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते माझं सर्वस्व आहेत. शरद पवारांवर माझा विश्वास आहे. बाळासाहेब आणि शरद पवारांचा जनमानसावर पगडा राहिला आहे, असं राऊत बोलले. उद्धव आणि राज ठाकरे हा विषय सोडून द्या, अशी विनंतीही यावेळी संजय राऊतांनी केली. राज आजही माझे मित्र आहेत. मी त्यावेळी त्यांना सांगायला गेलो होतो, असा वेगळा विचार करु नका, पण त्यावेळी गाडी जाळली गेली, अशी आठवण संजय राऊतांनी सांगितली.

Sanjay Raut says Ajit Pawar is Stepney