महाराष्ट्र सरकारच्या स्थिरतेबाबत पवारांच्या मनात शंका नाही, पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचं ट्वीट

उद्धव ठाकरे 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करतील, असा दावा शरद पवार यांनी केल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. राऊत यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.

महाराष्ट्र सरकारच्या स्थिरतेबाबत पवारांच्या मनात शंका नाही, पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचं ट्वीट
शरद पवार, संजय राऊत
| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 10:44 PM

मुंबई : प्रताप सरनाईकांचा लेटरबॉम्ब, काँग्रेसचा स्वबळाचा नारा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीगाठी या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सत्तापालटाच्या चर्चेला उधाण आलं आहे. महाविकास आघाडी सरकार त्यांच्या ओझ्यानंच पडेल, तेव्हा आम्ही सक्षम पर्याय देऊ, असं वक्तव्य केलंय. असं असलं तरी उद्धव ठाकरे 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करतील, असा दावा शरद पवार यांनी केल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. राऊत यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून राऊतांनी या भेटीची माहिती दिलीय. (Shivsena MP Sanjay Raut met NCP Chief Sharad Pawar)

राऊत यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत दिल्ली आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचं राऊतांनी सांगितलं. इतकंच नाही महाराष्ट्र सरकारच्या स्थिरतेबाबत पवारांच्या मनात शंका नसल्याचंही राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. “शरद पवार यांना भेटलो. दिल्ली महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा
झाली. महाराष्ट्र सरकारच्या स्थिरते संदर्भात त्यांच्या मनात शंका दिसत नाही. उद्धव ठाकरे पाच वर्षाचा कालावधी पुर्ण करतील. ते मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय आहेत असे पवार म्हणाले’, असं ट्वीट राऊत यांनी केलं आहे.

काँग्रेसच्या भूमिकेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काँग्रेस नेत्यांकडे खासगीत नाराजी व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे. पटोले यांनी राज्यात स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांपासून ते सुशीलकुमार शिंदे यांच्यापर्यंतच्या सर्वच नेत्यांनी पटोले यांच्या सुरात सूर मिसळला होता. निवडणुकीला अडीच वर्षे बाकी असताना पटोले यांनी ही भूमिका घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासगीत नाराजी व्यक्त केली आहे. सरकारला अस्थिर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, अशी धारणा शिवसेनेची झाली आहे. शिवाय राष्ट्रवादीनेही अशाच प्रकारची भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता असल्याची चर्चा राज्यात सुरु झाली आहे.

पवारांनी बोलावलेल्या बैठकीपासून शिवसेना दूर का?

राजधानी दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रमंचची एक बैठक काल पार पडली. या बैठकीला शिवसेनेला निमंत्रण नव्हतं. त्याबाबत विचारलं असता, पवारांकडे होणारी बैठक विरोधी पक्षाची बैठक नाही. ही बैठक राष्ट्रमंचच्या नेत्यांची आहे. तेवढंच या बैठकीला महत्त्व आहे. त्यामुळे बैठकीला जाण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांगतानाच काँग्रेस आणि शिवसेनेशिवाय तिसरी आघाडी होऊ शकत नाही, असा दावाही संजय राऊत यांनी केला होता. त्याचबरोबर पवार मोठे नेते आहेत. विविध क्षेत्रातील अनेक लोक त्यांचा सल्ला घेण्यासाठी येत असतात. काल माझं पवारांशी फोनवर बोलणं झालं. आजची बैठक ही यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रमंचची आहे. त्यांचे काही मुद्दे आहेत. त्यावर चर्चा होणार आहे. देशातील विरोधी पक्षांची ही बैठक नाही. फार फार तर मजबूत विरोधी पक्ष स्थापन करण्याची ही पहिली पायरी आहे, असं म्हणता येईल, असंही राऊतांनी सांगितलं होतं.

संबंधित बातम्या :

‘टाटा’ला जनतेचा वाटा देण्याची गरज काय? जितेंद्र आव्हाडांच्या निर्णयावर आता काँग्रेसचा तीव्र आक्षेप

ठाकरे सरकार कायद्याने चालत नाही हे राष्ट्रपतींना कळवा, फडणवीसांची राज्यपालांना विनंती

Shivsena MP Sanjay Raut met NCP Chief Sharad Pawar