‘टाटा’ला जनतेचा वाटा देण्याची गरज काय? जितेंद्र आव्हाडांच्या निर्णयावर आता काँग्रेसचा तीव्र आक्षेप

काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. 'टाटा'ला जनतेचा वाटा देण्याची गरज काय? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय.

'टाटा'ला जनतेचा वाटा देण्याची गरज काय? जितेंद्र आव्हाडांच्या निर्णयावर आता काँग्रेसचा तीव्र आक्षेप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गृहनिर्माणमंत्री नाना पटोले


जळगाव : टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या 100 सदनिका देण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात होतं. आव्हाड यांनी या स्थगितीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. इतकंच नाही तर भाजप नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या स्थगितीच्या निर्णयावर टीका केली होती. दरम्यान, डॅमेज कंट्रोल करण्यासाठी बॉम्बे डाईंग परिसरात टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र, आता काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. ‘टाटा’ला जनतेचा वाटा देण्याची गरज काय? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते. (Nana Patole questions Jitendra Awhad’s decision to allot flats to Tata Cancer Hospital)

राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत. अशा परिस्थितीत टाटाने आपला सीएसआर फंड वापरावा. टाटाला जनतेचा वाटा देण्याची गरज काय? असा सवाल पटोले यांनी उपस्थित केलाय. टाटा कॅन्सर रुग्णालयाला म्हाडाच्या सदनिका घेण्याचा निर्णय जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते या सदनिकांच्या चाव्या टाटा रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या. मात्र, या निर्णयावर महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नसल्याचं आता पाहायला मिळत आहे. कारण, शिवसेना आमदाराच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांकडून म्हाडाच्या सदनिका देण्याच्या निर्णयावर स्थगिती देण्यात आली. तर आता नाना पटोले यांनी टाटाला जनतेचा वाटा देण्याची गरज काय? असा प्रश्न विचारला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल!

म्हाडाच्या 100 सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याच्या आव्हाडांच्या निर्णयाला मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्थगिती दिली. या विषयावरुन राजकारण तापल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याबाबत खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिलीय. म्हाडाच्या 100 सदनिका रुग्णांच्या नातेवाईकांसाठी देण्यात आल्या. पण काही स्थानिकांनी विरोध केला आणि शिवसेना आमदाराने मुख्यमंत्र्यांना सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. पण मुख्यमंत्र्यांनी मला आज बोलावून घेतलं आणि सांगितलं की, त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या. 15 मिनिटात निर्णय झाला आणि बॉम्बे डाईंगमध्ये 100 सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलाही विसंवाद नाही. विसंवाद असता तर 24 तासाच्या आत निर्णय झाला नसता. मला आनंद याचा आहे की, काल मिळालेल्या स्थगितीला आज तेवढ्याच जागा, त्याच परिसरात देऊ शकलो, असंही आव्हाड यांनी म्हटलंय.

नेमकं प्रकरण काय?

राज्यच नव्हे तर देशभरातून टाटा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अनेक कॅन्सर रुग्ण येत असतात. मात्र त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवरच राहावं लागतं. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून म्हाडाच्या 100 खोल्या टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. 16 मे रोजी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे शरद पवार यांच्या हस्ते या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार केली होती. आपण आव्हाड यांच्याकडे वेळ मागितली होती. त्यांच्याकडे तक्रारही केली होती. पण त्यांनी वेळ दिली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. चौधरी यांच्या तक्रारीवर तपासून अहवाल सादर करावा तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी असा शेरा मारत या निर्णयाला स्थगिती दिली.

संबंधित बातम्या :

उद्धव ठाकरेंचा निर्णय योग्यच, पण मी मेलेल्या आईची शपथ घेऊन सांगतो…. : जितेंद्र आव्हाड

मी कुठल्याच आमदाराला भेट नाकारत नाही, कॅन्सर हवेतून पसरत नाही; चौधरींच्या आरोपाला आव्हाडांचं प्रत्युत्तर

Nana Patole questions Jitendra Awhad’s decision to allot flats to Tata Cancer Hospital

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI