मला त्यांची लाज… नीलम गोऱ्हे यांच्या सोडचिठ्ठीनंतर संजय राऊत यांची पहिलीच आणि खोचक प्रतिक्रिया

चालकाला डुलकी लागल्याने समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याचा अहवाल आला आहे. त्यावरून राऊत यांनी सरकारला फटकारलं. महाराष्ट्रात आणि देशात दुसरे रस्ते नाहीत का? तिकडे लोक गाड्या चालवत नाहीत का? इंडियन रेड काँग्रेस एक्सपर्ट आहे. त्यांचा अहवाल पाहा, असं राऊत म्हणाले.

मला त्यांची लाज... नीलम गोऱ्हे यांच्या सोडचिठ्ठीनंतर संजय राऊत यांची पहिलीच आणि खोचक प्रतिक्रिया
Neelam Gorhe
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 08, 2023 | 11:20 AM

पंढरपूर : आमदार नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. विकासाच्या मुद्द्यावर मी शिंदे गटात येण्याचा निर्णय घेतला आहे, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. गोऱ्हे यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. नीलम गोऱ्हे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर अत्यंत कठोर आणि जळजळीत शब्दात टीका केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

लाज वाटते मला. पाचवेळा आमदारकी दिली. अजून चालू आहे. त्यांच्यात थोडी जरी नैतिकता असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. त्यांना आतापर्यंत मिळालेलं प्रत्येक वैधानिक पद फक्त शिवसेना आणि ठाकऱ्यांमुळेच मिळालं. पाच पाच वेळा ज्यांना आमदारकी मिळाली, महिला आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद त्यांना सुरुवातीला मिळालं. विधान परिषदेचं उपसभापतीपद दिलं. एवढं दिल्यानंतरही एखादी व्यक्ती पक्ष सोडून जात असेल, कारणं काही असेल… विकास असेल, अन्याय असेल. तर मला त्यांची लाज वाटते. महाराष्ट्रालाही त्यांना लाज वाटते. ज्या विचारसरणीतून त्या आल्या तरीही त्यांना जे जे हवं ते दिलं. पण चारपाच महिन्यासाठी कुणी पद राहावं म्हणून कोणी अशा प्रकारची बेईमानी करत असतील तर त्यांना आम्ही राजकीय श्रद्धांजली वाहतोय, अशी जळजळीत टीका संजय राऊत यांनी केली.

निवडणूक लढवणार नाही

संजय राऊत आमच्यामुळे राज्यसभेत गेले आहेत. त्यांनी लोकांमधून निवडून यावे. आपल्या पदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढवावी, असं आव्हान शिंदे गटाच्या आमदारांकडून दिलं जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी कोणतीच निवडणूक लढवणार नाही. माझ्या पक्षाने मला राज्यसभेत पाठवलं. माझ्या पक्षाचं नेतृत्व करत असतो. मी माझ्या पक्षाची बाजू मांडत असतो, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

टिकणं सोप्प नाही

चार दिवस उलटले तरी अजूनही अजित पवार गटाच्या मंत्र्यांना खाती दिली नाहीत. त्यावरूनही राऊत यांनी अजित पवार यांना टोला लगावला. भाजपच्या तंबूत जावून टिकणं सोपं नाही. एकटी शिवसेनाच आहे 25 वर्ष राहून बाहेर पडली, असं चिमटा राऊत यांनी काढला.