‘मी पुन्हा येईन’ असं सारखं म्हणणार नाही, पण पुढचे 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री : संजय राऊत

| Updated on: Nov 15, 2019 | 10:30 AM

मी सारखं 'पुन्हा येईन'-'पुन्हा येईन' म्हणत नाही, असं बोलत राऊतांनी देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला.

मी पुन्हा येईन असं सारखं म्हणणार नाही, पण पुढचे 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री : संजय राऊत
Follow us on

मुंबई : ‘मी पुन्हा येईन’ असं सारखं म्हणणार नाही. पण पुढचे पाचच काय, तर पुढचे 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. राऊतांनी दररोज पत्रकार परिषद घेण्याचा सिलसिला आपल्या वाढदिवशीही कायम (Sanjay Raut Shivsena CM for 25 years) ठेवला.

‘किमान समान कार्यक्रमा’वर काम सुरु आहे. अद्याप कोणताही फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. मात्र फॉर्म्युलाची चिंता कोणीही करु नये. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्षम आहेत. आम्ही 24 तारखेपासून सांगत आहोत. लाख प्रयत्न करा आम्हाला थांबवण्याचा, पण शिवसेनेच्याच नेतृत्वात सत्तास्थापन होईल’ असा विश्वास संजय राऊत यांनी बोलून दाखवला.

शिवसेनेचा मुख्यमंत्री पाच वर्षांसाठी असेल, की राष्ट्रवादीसोबत अडीच-अडीच वर्ष वाटून घेणार, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर पाचच काय, पुढील 25 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं. बातम्या पेरणाऱ्यांचे स्रोत मला माहित आहेत, असंही राऊत म्हणाले.

Happy Birthday Sanjay Raut : सत्तेच्या सारीपाटावरचा मोहरा ‘संजय राऊत’

मी सारखं ‘पुन्हा येईन’-‘पुन्हा येईन’ म्हणत नाही, असं बोलत राऊतांनी देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला. महाराष्ट्राशी आमचं पाच वर्षांचं टेम्पररी नातं नाही. आम्ही राज्यातच राहणार. येत-जात नाही राहणार, असं संजय राऊत म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ का नाही दिलं? आम्हीच ‘भारतरत्न’ची मागणी केली होती, असं संजय राऊतांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर भाष्य केलं.

काँग्रेस नेत्यांचं, वसंतदादा पाटील यांचं स्वातंत्र्यसंग्रामात मोठं योगदान असल्याचं आम्ही कायमच सांगत आलो आहोत, असंही राऊत म्हणाले. वाजपेयी पहिलं सरकार, शरद पवार 1980 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झालं ते पुलोद सरकारही संमिश्र होतं. पवार काँग्रेस विचारधारेचे होते, पण त्यांच्या मंत्रिमंडळात भाजप-जनसंघाचे नेते होते, अशी आठवणही राऊतांनी (Sanjay Raut Shivsena CM for 25 years) करुन दिली.

महासेनाआघाडीत मुख्यमंत्रिपद कोणाकडे असेल, असं नवाब मलिक यांना विचारण्यात आलं होतं, त्यावर ‘मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरच शिवसेना वेगळी झाली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान राखणं आणि त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल.’ असं नवाब मलिक म्हणाले होते.