…अन्यथा खेचाखेचीत महाराष्ट्राचं राजवस्त्र फाटेल : संजय राऊत

एकत्र बसायचं आणि राजवस्त्र विणायचं, तेही महाराष्ट्राचे. नाहीतर खेचाखेचीत राजवस्त्र फाटेल, हे आम्हाला कळतं. आम्ही त्या संस्कारातून आलोय, असं संजय राऊत म्हणाले.

...अन्यथा खेचाखेचीत महाराष्ट्राचं राजवस्त्र फाटेल : संजय राऊत


मुंबई : दिवाळीनिमित्त मंत्र्यांनी राज्यपालांना भेटणं ही प्रथा आहे. याचा राजकीय अर्थ कुणी काढू नये, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut Maharashtra Ministry) यांनी म्हटलं. “सत्ता स्थापन करताना बहुमताचा आकडा असलेली यादी राज्यपालांकडे न्यावी लागते. ती यादी आज मुख्यमंत्र्यांकडे आहे का? नाही…कारण शिवसेनेकडून अद्याप कुठलं कम्युनिकेशन नाही. तशी यादी दिवाकर रावते यांच्याकडे आहे का ? नाही..”, असं संजय राऊत (Sanjay Raut Maharashtra Ministry) म्हणाले.

राज्यपालांकडे दिवाळीनिमित्त व्यक्तिगत शुभेच्छांची देवाण घेवाण झाली. दबावतंत्राचं राजकारण शिवसेनेनं आयुष्यात कधी केलं नाही. बाळासाहेबांनी कधी कुणावर दबाव टाकला नाही, दबाव स्वीकारला नाही. उद्धव ठाकरेंचंही तसं राजकारण नाही. पण तुझं ते तुझं आणि माझं ते माझं असं आमचं स्पष्ट मत आहे. माझं ते कुणाच्या बापाचं नाही. आणि कुणाचं हिसकवून घ्यायला आम्ही बसलेलो नाही, असं संजय राऊत यांनी नमूद केलं.

एकत्र बसायचं आणि राजवस्त्र विणायचं, तेही महाराष्ट्राचे. नाहीतर खेचाखेचीत राजवस्त्र फाटेल, हे आम्हाला कळतं. आम्ही त्या संस्कारातून आलोय, असं संजय राऊत म्हणाले.

सत्ता महाराष्ट्रासाठी राबवायची आहे, व्यक्तिगत हित किंवा खुर्च्यांसाठी नाही. अमित शाह, फडणवीस ‘मातोश्री’वर कधी येणार हे भाजपच्या नेत्यांना विचारा, असं राऊत यांनी सांगितलं.

‘शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा

आमच्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा हे प्राधान्य आहे. कुणी व्हावं हे उद्धव ठाकरे ठरवतील. आम्हा सर्वांची, राज्याची इच्छा आहे आदित्य ठाकरे विधानसभेत आलेले आहेत. त्यांनी नेतृत्व करावं. अनेक वर्षांपासून आम्ही उद्धव ठाकरेंचं मन वळण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. पण बाळासाहेबांप्रमाणे ते नेहमीच निवडणुकीच्या राजकारणापासून लांब राहिले, असं संजय राऊत यांनी नमूद केलं.

अल्प बहुमतातील सरकार ही संकल्पना ज्या कुणाच्या सडक्या डोक्यातून आली असेल त्यांना अजून देशाचं राजकारण कळलेलं नाही, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.

‘उद्धव ठाकरे कठोर निर्णय घेणारेही आहेत’

शिवसेनेचा मुख्यमंत्री कुठे शपथ घेईल हे उद्धव ठाकरे ठरवतील. पण भाजपने युतीचा म्हणून ठरवलं असेल तर युती मिळून निर्णय घेऊ. पण महाराष्ट्रात अस्थिरता आणायची नाही. शिवसेनेनं कधी कुणाच्या पाठीत वार केला नाही. उद्धव ठाकरे हे संयमी आहेत तरी प्रसंगी कठोर निर्णय घेणारेही आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

.. तो राष्ट्रवादीचा प्रश्न

राष्ट्रवादीत विरोधी पक्षनेता कोण हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. बँकेच्या बाबतीत जर काही घडलं असेल तर धनंजय मुंडे कारवाईला सामोरे जातील. ही कायदेशीर प्रक्रिया आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अनेकांना या देशात वॉशिंग मशीनमध्ये धुवून उभं केलेलं सर्वांनी पाहिलं आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI