सतेज पाटलांची घोषणा, पुतण्या ऋतुराजला उमेदवारी, काँग्रेसच्या मेळाव्यात शिवसेना खासदार मंचावर

सतेज पाटलांची घोषणा, पुतण्या ऋतुराजला उमेदवारी, काँग्रेसच्या मेळाव्यात शिवसेना खासदार मंचावर

काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी पुतण्या ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) यांची उमेदवारी जाहीर केली.

सचिन पाटील

|

Sep 05, 2019 | 4:31 PM

कोल्हापूर: काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी पुतण्या ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) यांची उमेदवारी जाहीर केली. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून यंदा ऋतुराज पाटील हे रिंगणात उतरणार असल्याची घोषणा सतेज पाटील यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केली. महत्त्वाचं म्हणजे सतेज पाटील यांच्या या मेळाव्याला शिवसेना खासदार संजय मंडलिक (Shiv Sena MP Sanjay Mandlik) हे सुद्धा उपस्थित होते.

आमदार सतेज पाटील यांच्या निर्णयास माझा पाठिंबा आहे, असं शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी यावेळी सांगितलं. लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांना मदत केली होती. त्याची परतफेड म्हणून पक्ष विसरुन संजय मंडलिक हे शिवसेना खासदार असूनही काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या मेळाव्याला हजर राहिले.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील हे कोल्हापूर दक्षिणमधून लढले होते. मात्र त्यावेळी त्यांचा भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी पराभव केला होता. त्यामुळे या पराभवाचा वचपा म्हणून सतेज पाटील यांनी अमल महाडिक यांचे चुलत बंधू धनंजय महाडिक यांच्याविरोधात लोकसभेला भूमिका घेतली. राष्ट्रवादीकडून लढलेल्या धनंजय महाडिक यांचा पराभव झाला. नुकतंच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ (Kolhapur South Vidhan Sabha)

कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात हाय-टेन्शन मतदारसंघ म्हणून कोल्हापूर दक्षिण (Kolhapur South) या मतदार संघाकडे पाहिलं जातं. कारण याठिकाणी पारंपरिक शत्रू असलेले महाडिक गट आणि सतेज पाटील (Satej Patil) गट समोरासमोर असतील . 2014 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐनवेळी उमेदवारी दिलेले अमल महाडिक यांनी तत्कालिन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा पराभव करत मोठा धक्का दिला होता.

भाजपमध्ये प्रवेश करुन अवघ्या काही दिवसात अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी चमत्कार करुन दाखवला होता. त्यातूनच महाडिक आणि पाटील गटाचं राजकीय शत्रूत्व शिगेला पोहोचलं. धनंजय महाडिक यांना 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत मदत करुनदेखील विधानसभेला महाडिक यांनी धोका दिल्याचा आरोप सतेज पाटील यांचा आहे. त्याचाच हिशेब सतेज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणत चुकता केला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांचा पराभव झाला.

आता पुन्हा दक्षिणमधून सतेज पाटील यांनी दंड धोपटले आहेत. त्यामुळं कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील विरुद्ध अमल महाडिक अशी लढत होऊ शकते. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. 2014 मध्ये आमदार अमल महाडिक यांना 1,05,489 मतं मिळाली होती. तर पराभूत सतेज पाटील यांना 96,961 मतं मिळाली होती.

संबंधित बातम्या 

कोल्हापूरचा आढावा : लोकसभा झाली, आता विधानसभेला कुणाचं काय-काय ठरलंय? 

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें