VIDEO : एक बार मैने डिसिजन लिया, तो मैं किसीं की नहीं सुनता : सतेज पाटील

VIDEO : एक बार मैने डिसिजन लिया, तो मैं किसीं की नहीं सुनता : सतेज पाटील

कोल्हापूर : एक बार मैने डिसिजन लिया, तो मैं किसीं की नहीं सुनता…. थोडेफार शब्द बदलून ही डायलॉगबाजी केलीय काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आणि त्यांचा निशाणा होता अर्थात त्यांचे राजकीय शत्रू खासदार धनंजय महाडिक यांच्यावर. दोन्ही काँग्रेसने सेना- भाजपला रोखण्यासाठी आघाडी केली. मात्र कोल्हापुरात ‘बंटी आणि मुन्ना’ यांची मात्र आघाडी झाली नाही. कोणत्याही परिस्थितीत महाडिक यांना मदत करणार नसल्याचं सतेज पाटील यांनी अनेकवेळा जाहीर केलंय.

वरिष्ठ पातळीवरून आघाडीचा धर्म पाळण्यासाठी सतेज पाटील यांना समजावण्याचा प्रयत्न सुरु आहेत. मात्र तरी देखील कोणत्याही परिस्थितीत धनंजय महाडिक यांना मदत करणार नसल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे वरिष्ठांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. आता तर त्यांनी गृहिणी महोत्सवाच्या कार्यक्रमात ‘एक बार मैने डिसीजन लिया तो मैं किसीं की नहीं सुनता’ असं म्हटलंय. त्यामुळे आता काँग्रेसच्या नेत्यांसमोरही मोठा प्रश्न उभा राहीला आहे.

VIDEO : पाहा काय म्हणाले सतेज पाटील?

मुन्ना-बंटी यांचा वाद काय?

डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र सतेज पाटील यांचे राजकारणातील कट्टर शत्रू मानले जाणारे धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. हे दोघेही एकमेकांचे हाडवैरी आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पाठिंबा मागितला होता. त्यानंतर सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्यासोबतचं वैर विसरुन, त्यांना निवडून आणण्याची शपथ घेतली होती. इतकंच नाही तर मोदी लाटेत धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार निवडूनही आले होते. सतेज पाटलांच्या पाठिंब्यामुळे धनंजय महाडिक निवडून आले.

मांत्रिकाच्या घरावर कोण बाहुली बांधणार? महाडिकांचा सतेज पाटलांवर पलटवार

मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली. त्यामुळे सतेज पाटील यांच्याविरोधात भाजपकडून धनंजय महाडिकांचा चुलत भाऊ आणि महादेवराव महाडिकांचे सुपुत्र अमल महाडिक उभे राहिले. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात काँटे की लढाई झाली. या निवडणुकीत सतेज पाटील यांना हरवण्यासाठी धनंजय महाडिक यांनी प्रचंड जोर लावला. त्याचा परिणाम म्हणून तत्कालिन गृहराज्यमंत्री असलेले सतेज पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे बंटी-मुन्ना पुन्हा एकदा कट्टर शत्रू बनले. लोकसभा निवडणुकीत मदत करुनही धनंजय महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीत धोकेबाजी केल्याचा आरोप सतेज पाटील यांचा आहे.

याशिवाय काँग्रेसचे विधानपरिषदेचे तत्कालीन आमदार असलेले महादेवराव महाडिक यांनीही काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार न करता, निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या मुलाचा प्रचार करुन, सतेज पाटील यांचा पराभव केला.

या सर्वांचा वचपा सतेज पाटील यांनी 2015 मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काढला. सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांचा पराभव केला. तेव्हापासून महाडिक विरुद्ध बंटी असा सामना कोल्हापुरात सातत्याने रंगला आहे. मग ती जिल्हा परिषद निवडणूक असो, महापालिका निवडणूक असो, गोकुळ दूधसंघ निवडणूक असो वा साखर कारखान्याची निवडणूक असो, सर्व ठिकाणी मुन्ना विरुद्ध बंटी असा सामना पाहायला मिळतो.


Published On - 12:26 pm, Sun, 10 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI