‘या’ दोन निकषांवर पार्थला मावळमधून उमेदवारी : शरद पवार

'या' दोन निकषांवर पार्थला मावळमधून उमेदवारी : शरद पवार

पुणे : मी स्वत: लोकसभा निवडणूक न लढता नव्या पिढीला उमेदवारी देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली आणि सोबतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देणार असल्याचीही घोषणा केली. मात्र, पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांनी दोन निकष सांगितले.

कोणत्या दोन निकषांवर पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी?

पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्याबाबत शरद पवार म्हणाले, “आमच्या कुटुंबीयांमधील सुप्रिया सुळे उमेदवारी करणार आहेत, तर पार्थ पवार यांच्या उमेदवारीसंदर्भात शेकापचे जयंत पाटील यांनी त्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवाराला संधी द्यावी, असा विचार आहे. त्यामुळे मी लोकसभा निवडणूक न लढता नव्या पिढीला पार्थला उमेदवारी देण्याच्या निर्णयापर्यंत आम्ही आलो आहोत.”

तसेच, लोकमान्यता आणि निवडणूक येण्याची क्षमता या निकषांवर आम्ही उमेदवारीचा निर्णय घेतो, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांची उमेदवारी अप्रत्यक्षरित्या जाहीरच करुन टाकली.

शेकापचे आमदार जयंत पाटील काय म्हणाले होते?

पार्थ पवार हे मावळमधून लढल्यास लढत एकतर्फी होईल. शिवाय, पार्थ पवार हे समर्थ उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांना शेकापच्या सर्व कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

मावळ लोकसभा मतदारसंघाची रचना आणि सद्यस्थिती

मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यात विभागला गेला आहे. पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि रायगडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघांचा मिळून मावळ लोकसभा मतदारसंघ बनला आहे.

  • पिंपरी (पुणे) – गौतम चाबुकस्वार, शिवसेना
  • चिंचवड (पुणे) – लक्ष्मण जगताप, भाजपा
  • मावळ (पुणे) – संजय उर्फ बाळा भेगडे, भाजपा
  • कर्जत (रायगड) – आ. सुरेश लाड, राष्ट्रवादी काँग्रेस
  • उरण (रायगड) – आ. मनोहर भोईर, शिवसेना.
  • पनवेल (रायगड) – आ. प्रशांत ठाकूर, भाजपा

पिंपरी चिंचवड आणि रायगड जिल्ह्यातील सहा मतदार संघाचा मावळ लोकसभा मतदार संघ बनलाय. त्यामुळे साहजिकच इथल्या समस्याही वेगळ्या आहेत. रायगड हा कोकणातला भाग आहे, त्यामुळे कोकणातल्या ज्या समस्या आहेत, त्याच समस्या इथल्या लोकांना आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या वेगळ्याच आहेत.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI