मी सभासदही नव्हतो त्या संस्थेच्या खटल्यात नाव गोवलं : शरद पवार

मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. ईडीने गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये अजित पवार यांच्यासह 70 माजी संचालकांचा समावेश आहे.

मी सभासदही नव्हतो त्या संस्थेच्या खटल्यात नाव गोवलं : शरद पवार

मुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (money laundering sharad pawar) यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल झालाय. त्यांच्यासोबत पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (money laundering ajit pawar) यांच्यावरही गुन्हा दाखल झालाय. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने मनी लाँडरिंग अर्थात पैशाची अफरातफर/आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल (money laundering sharad pawar) केला आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. ईडीने गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये अजित पवार यांच्यासह 70 माजी संचालकांचा समावेश आहे.

ईडीच्या या कारवाईनंतर शरद पवारांनी पहिल्यांदाच टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली. सहकारी बँकेवर अनियमितता केल्याचा आरोप होता. पण ज्या संस्थेचा मी सभासदही नव्हतो, त्यात माझं नाव गोवलं गेलंय. याबाबत अधिक काही बोलण्याची गरज नाही. राज्यभरात माझे सुरु असलेले दौरे सुरुच राहतील, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

“सहकारी संस्थांना त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना कर्ज देण्याची जबाबदारी संबंधित बँक संचालकांनी घेतली. त्यामुळे बँकेचं नुकसान झालं, त्याकाळात जे संचालक आले ते शरद पवार यांच्या विचाराचे होते. त्यांच्या संमतीने हे निर्णय झाले असतील असं सांगितलं जात आहे. मी राज्यातील कोणत्याही बँकेच्या संचालक मंडळावर नाही. संचालक मंडळाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मी कधीही हस्तक्षेप केलेला नाही.

तक्रारदारांनी बँकेच्या अनियमततेविषयी तक्रार केली आहे. त्यांनी माझ्या विचारांच्या संचालकांनी अनियमतता केली असं म्हटलं. तो त्यांच्या तक्रारीचा भाग आहे. त्याचा आधार घेऊन पोलीस आणि ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली असेल तर मी त्यांना धन्यवाद देतो.

सहकारी संस्थांना मदत करणं गुन्हा नाही. आज माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल तर त्यांचं स्वागत आहे. मी राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये गेलो तिथे मला आणि माझ्या पक्षाला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर माझ्यावर अशी कारवाई झाली नसती तरच मला आश्चर्य वाटलं असतं. निवडणुकीच्या तोंडावर या कारवाया होत आहेत. महाराष्टातील जनतेसमोर हे आल्यावर त्यांना निवडणुकीत उत्तर मिळेल.

मुंबई पोलीस असो की ईडी असो, मी संबंधित बँकेत संचालक नसतानाही त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करणं हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला मिळणारा प्रतिसाद पाहता होत आहे,” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *