शरद पवारांच्या प्रकृतीविषयी विकृत फेसबुक पोस्ट, राष्ट्रवादीची सायबर पोलिसात तक्रार

शरद पवारांविरोधात विकृत लिखाण करणाऱ्या व्यक्तींविरोधात मुंबईत सायबर क्राईममध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. (Sharad Pawar Health heinous Facebook Post)

  • अश्विनी सातव डोके, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 8:37 AM, 1 Apr 2021
शरद पवारांच्या प्रकृतीविषयी विकृत फेसबुक पोस्ट, राष्ट्रवादीची सायबर पोलिसात तक्रार
शरद पवार

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आजारपणाविषयी सोशल मीडियावर हीन दर्जाच्या पोस्ट्स करणाऱ्या विकृतांवर कारवाई केली जाणार आहे. सायबर क्राईम विभागाकडे अशा युजर्सविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांनी दिली. शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यावर, कार्यकर्त्यावर मर्यादा सोडून टीका केली तर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी शेख यांनी दिला. (Sharad Pawar Health heinous Facebook Post NCP files complaint in Cyber Police)

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सध्या आजारी आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पवार साहेब तिथे उपचार घेत असून, सर्व उपचारांना ते अतिशय उत्तम प्रकारे प्रतिसाद देत आहेत. जी आमच्यासाठी तसेच साहेबांवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे.” असं मेहबूब शेख म्हणाले.

“पवारांच्या प्रकृतीविषयी काळजीचे सूर”

“शरद पवार यांच्या आजारपणाची बातमी बाहेर आली आणि समाजातील प्रत्येक घटकांतून त्यांच्याप्रती काळजीचे सूर बाहेर पडले. समाजातील असा कोणताही घटक नसेल, ज्यातून साहेबांची ख्याली खुशाली विचारणारे फोन आले नाहीत. मला जसा अनुभव आला तसाच अनुभव आमच्या पक्षातील अनेक पदाधिकारी आणि नेत्यांना देखील आला.” असंही शेख यांनी सांगितलं.

“हे काळजीचे जसे फोन येत होते, मेसेजेस येत होते, त्याच्याविरोधात अनेक विकृत मंडळी शरद पवारांच्या आजारपणाबाबत अतिशय विकृत आणि हीन दर्जाच्या पोस्ट्सही सोशल मीडियावर पोस्ट करत होती. काहींनी तर शरद पवार यांच्या मृत्यूची आशा करत आपली विकृती समाजासमोर ठेवली.” अशी चिंता मेहबूब शेख यांनी व्यक्त केली.

“शरद पवारांविरोधात विकृत लिखाण”

“या पोस्ट्स पाहून शरद पवारांना मानणाऱ्या आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना खूप त्रास झाला. भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी टीकेच्या सर्व मर्यादा पार करत गेली 50 वर्ष या राज्याचा भार समर्थपणे वाहणाऱ्या आणि आमच्यासाठी आमचा मान, स्वाभिमान असणाऱ्या साहेबांवर केलेली ही टीका अतिशय जिव्हारी लागणारी होती. परिणामी मी आणि माझ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी या विकृत आणि समाजकंटक लोकांना अद्दल घडवण्याचे ठरवले आहे. त्याचाच भाग म्हणून आम्ही मुंबई येथे शरद पवारांविरोधात विकृत लिखाण करणाऱ्या लोकांविरोधात सायबर क्राईमचे एसपी शिंत्रे यांची भेट घेऊन कलम 153 अ, 505(2), 500, 504, 469, 499, 507, 35, आयटी कलम 66(D) नुसार सायबर क्राईमला गुन्हे दाखल केले आहेत.” अशी माहिती शेख यांनी दिली.

“आतापर्यंत आम्ही खूप शिस्तीत भूमिका घेत सोशल मीडियावर व्यक्त होत होतो, आहोत. पण यापुढे मात्र आदरणीय साहेबांवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर मर्यादा सोडून टीका केली तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे निक्षून सांगतो आहोत.” असा इशाराही मेहबूब शेख यांनी दिला.

संबंधित बातम्या :

शस्त्रक्रियेनंतर सुप्रिया सुळेंनी ट्विट केला शरद पवारांचा फोटो, म्हणाल्या…

शरद पवारांची विचारपूस करण्यासाठी नारायण राणे सहकुटुंब ब्रीच कँडीत

(Sharad Pawar Health heinous Facebook Post NCP files complaint in Cyber Police)