Sharad Pawar : ‘संभाजीराजे असोत की, आणखी कुणी, मतं शिवसेनेच्याच उमेदवाराला’ शरद पवारांचा राज्यसभेच्या जागेवर शेवटचा शब्द

शिवसेनेकडून राज्यसभेसाठी दुसरा उमेदवार दिला जाणार असल्याचं जाहीर केलं आणि आता पवारांनी आपली भूमिका बदलल्याचं पाहायला मिळत आहे. संभाजीराजे असोत की, आणखी कुणी, राष्ट्रवादी काँग्रेसची शिल्लक राहणारी मतं शिवसेनेच्या उमेदवाराला दिली जातील, अशी घोषणा पवार यांनी केली आहे.

Sharad Pawar : संभाजीराजे असोत की, आणखी कुणी, मतं शिवसेनेच्याच उमेदवाराला शरद पवारांचा राज्यसभेच्या जागेवर शेवटचा शब्द
शरद पवार, संभाजीराजे छत्रपती
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 21, 2022 | 7:47 PM

पुणे : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे. राज्यातील राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार या सहा जागांपैकी भाजपच्या 2 जागा तर शिवसेना, कांग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. अशावेळी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chatrapati) यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. सर्व राजकीय पक्षांना मदतीचं आवाहनही त्यांनी केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर केला. तसंच शिल्लक राहिलेली मतं त्यांना दिली जातील अशी घोषणाही त्यांनी केली होती. मात्र, शिवसेनेकडून(Shivsena)  राज्यसभेसाठी दुसरा उमेदवार दिला जाणार असल्याचं जाहीर केलं आणि आता पवारांनी आपली भूमिका बदलल्याचं पाहायला मिळत आहे. संभाजीराजे असोत की, आणखी कुणी, राष्ट्रवादी काँग्रेसची शिल्लक राहणारी मतं शिवसेनेच्या उमेदवाराला दिली जातील, अशी घोषणा पवार यांनी केली आहे.

‘शिवसेना जो उमेदवार देईल ते त्याला आम्ही मतदान करू’

राज्यसभेच्या सहाव्या जागेबाबत संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. त्याबाबत पवारांना विचारलं असता ते म्हणाले की, ‘आमच्या पक्षापुरतं सांगतो. आमची एकच जागा आहे. त्यासाठीचा नंबर आमच्याकडे आहे. एक जागा निवडून देऊन आमच्याकडे काही मतं शिल्लक आहेत. दोन वर्षापूर्वी आमच्याकडे एकच जागा येत होती. मुख्यमंत्र्यांना सांगितलं आम्हाला दोन जागा हव्या. मी आणि फौजिया खान. मुख्यमंत्री म्हणाले तुम्ही असाल तर आम्ही देतो. पण पुढच्यावेळी दोन जागा आम्हाला दिल्या पाहिजे. ते आम्ही मान्य केलं. आता आमच्याकडील शिल्लक मते आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराशिवाय कुणाला देऊ शकत नाही. त्यांनी जे नाव दिलं त्या नावाला आम्ही पाठिंबा देणार. मग ते संभाजीराजे असो की इतर कुणी असो. शिवसेना जो उमेदवार देईल ते त्याला आम्ही मतदान करू. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मतांवर उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

आधी संभाजीराजेंना पाठिंब्याची घोषणा

शरद पवार यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीस महाविकास आघाडीकडून पाठिंबा जाहीर केला होता. त्यावेळी पवार म्हणाले की, महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रत्येकी एक-एक जागा हमखास निवडून येऊ शकतात. याव्यतिरिक्त शिल्लक राहणारी मते सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजेंना देऊ, असं पवारांनी जाहीर केलं होतं. इतकंच नाही तर भाजपने त्यांना मराठा आरक्षणावर बोलायला संधी दिली नव्हती. राजे हे एका समाजाचे नेते नसतात. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करायला हवं. पण भाजपने त्यांना चांगली वागणूक दिली नाही, असा आरोप शरद पवार यांनी केला होता.