Sharad Pawar: ही काही साधी गोष्ट नाही, एकनाथ शिंदेंच्या बंडाचं शरद पवारांना असही कौतूक, कुवतीचा खास उल्लेख!

| Updated on: Jun 30, 2022 | 9:27 PM

'आम्ही कमी पडलो नाही. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या लोकांना बाहेर न्यायला प्रभावी ठरले. त्याचा मूळ इफेक्ट. 38 आमदार बाहेर जातात, ही काही साधी गोष्ट नाही. ती नेण्यासाठी कुवत शिंदेंनी दाखवली. त्यातच त्यांचं यश आहे'.

Sharad Pawar: ही काही साधी गोष्ट नाही, एकनाथ शिंदेंच्या बंडाचं शरद पवारांना असही कौतूक, कुवतीचा खास उल्लेख!
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याला नवं सरकार मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्यात. त्यावेळी पत्रकारांनी महाविकास आघाडी सरकार टिकवण्यात उद्धव ठाकरे, तुम्ही कमी पडलात का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी पवार म्हणाले की, ‘आम्ही कमी पडलो नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेच्या लोकांना बाहेर न्यायला प्रभावी ठरले. त्याचा मूळ इफेक्ट. 38 आमदार बाहेर जातात, ही काही साधी गोष्ट नाही. ती नेण्यासाठी कुवत शिंदेंनी दाखवली. त्यातच त्यांचं यश आहे’.

शिंदेंना पवारांच्या अंतकरणापासून शुभेच्छा

आज एकनाथ शिंदे यांच्यावर जी जबाबदारी पडली. माझं त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं, त्यांना शुभेच्छा दिल्या. अपेक्षा अशी आहे की एकदा राज्याचा प्रमुख झाल्यावर तो राज्याचा होतो. तो कोणत्या पक्षाचा प्रतिनिधी असेल. पण शपथ घेतल्यावर तो राज्याचा प्रतिनिधी होतो, राज्याचा प्रमुख होतो. राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडून कामगिरी व्हावी ही अपेक्षा आहे आणि ती मी त्यांना बोलून दाखवली. त्यासाठी त्यांना अंत:करणापासून शुभेच्छा दिल्या, अशी माहितीही पवार यांनी दिलीय.

उद्धव ठाकरेंना सूचक संदेश

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हायजॅक केलीय का? असा प्रश्नही पवारांना विचारला. त्यावर उद्धव ठाकरेंच्या पक्षातील सहकाऱ्यांचं मत असेल तर माहीत नाही. ते लोकांवर विश्वास टाकतात आणि पूर्ण जबाबदारी देतात हा त्यांचा स्वभाव आहे. उद्धव ठाकरेंनी संघटनेची जबाबदारी आणि विधीमंडळाची संपूर्ण जबाबदारी शिंदेकडे दिली होती. त्याचा हा कदाचित परिणाम आहे की नाही मला माहीत नाही, असंही पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्रीपदी फडणवीस, पवारांसाठी आश्चर्याचा धक्का

दुसरं आश्चर्य म्हणजे तसं आश्चर्य नाही पण पुन्हा कार्यपद्धतीत आदेश दिल्यानंतर तो आदेश तंतोतंत पाळावं लागतो. त्याचं उत्तम उदाहरण जे मुख्यमंत्री होते, पाच वर्ष काम केलं, नंतर विरोधी पक्षाचं नेतृत्व केलं, त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. हा आश्चर्याचा धक्का होता. पण एकदा पक्षानं आदेश दिला की सत्तेची कोणतीही संधी मिळाली तर ती स्वीकारायची असते. याचं उदाहरण फडणवीसांनी आज घालून दिलं आहे. या दोन्ही गोष्टी आम्हाला कुणाला माहित नव्हत्या, पण असं घडलं. तर ते अंमलात येतं आणि ते येईल. ते अंमलात येण्यासाठी कोणी नकार किंवा प्रतिक्रिया देईल असं वाटलं नव्हतं, पण ते खरं ठरलं. असं मतही शरद पवार यांनी व्यक्त केलंय.