Shiv Sena : राजकीय लढाया कुटुंब उद्ध्वस्त करण्यापर्यंत पोहोचल्या, हा सत्तेचा माज आणि अहंकार, शिवसेनेची टीका

| Updated on: Jun 16, 2022 | 7:20 AM

Shiv Sena : राजकीय लढाया निवडणुकीच्या आखाड्यात लढायच्या असतात. हीच या देशाची परंपरा आहे. आज राजकीय लढाया कुटुंब उद्ध्वस्त करण्यापर्यंत पोहोचल्या. राहुल गांधी यांना छळायचे व आम्ही त्यांचा छळ करू शकतो याचे प्रदर्शन घडवायचे.

Shiv Sena : राजकीय लढाया कुटुंब उद्ध्वस्त करण्यापर्यंत पोहोचल्या, हा सत्तेचा माज आणि अहंकार, शिवसेनेची टीका
राहुल गांधी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांची गेल्या तीन दिवसांपासून ईडीने चौकशी केली. पुन्हा एकदा त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. यावरून शिवसेनेने (shiv sena) भाजपवर (bjp) जोरदार हल्लाबोल केला आहे. . ‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी सोनिया व राहुल गांधी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते, राहुल गांधी यांना रोज साडेआठ तास ‘ईडी’ कार्यालयात बसवून ठेवले जाते. हे का, तर आम्ही विरोध करणारे कितीही मोठे असले तरी त्यांच्या कॉलरला हात घालू शकतो हे दाखवून देण्यासाठी आहे. हा सत्तेचा माज व अहंकार आहे, अशी टीका करतानाच राजकीय लढाया कुटुंब उद्ध्वस्त करण्यापर्यंत पोहोचल्या आहेत, असंही शिवसेनेने म्हटलं आहे. दैनिक सामनाच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे. विरोधकांना खतम करण्यासाठी हिटलरने ‘ज्यूं’च्या कत्तली केल्या तसे ‘विषारी गॅस चेंबर्स’ निर्माण करणे तेवढेच बाकी आहे. राजकीय सूडाची पावले त्याच दिशेने पडत आहेत. देशात कायद्याचे राज्यच राहिले नाही, तेथे ‘कायदा सगळय़ांसाठी समान’ या बोलण्यास काय अर्थ?, असा सवालही या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

राजकीय लढाया निवडणुकीच्या आखाड्यात लढायच्या असतात. हीच या देशाची परंपरा आहे. आज राजकीय लढाया कुटुंब उद्ध्वस्त करण्यापर्यंत पोहोचल्या. राहुल गांधी यांना छळायचे व आम्ही त्यांचा छळ करू शकतो याचे प्रदर्शन घडवायचे, विरोधात उठलेला प्रत्येक श्वास बंद करायचा हीच नवी लोकशाही उदयास आली आहे. बुलडोझर फक्त घरांवरच फिरतो असे नाही, तो व्यक्तीच्या नागरी अधिकारांवर आणि देशाच्या स्वातंत्र्यावरही फिरताना स्पष्ट दिसत आहे. आज राहुल गांधी, उद्या सोनिया गांधी, त्यानंतर आणखी कोणी, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेचे आसूड आणि फटकारे

  1. भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी काँग्रेसचा सत्याग्रह हा तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. ”कायद्याच्या वर कोणी नाही, कायद्यापुढे सर्व समान आहेत,” असेही सौ. इराणी म्हणतात ते खरेच आहे, पण भाजपपुढे कायदा आज खुजा झालेला दिसतोय. शिवसेना, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांच्याच मागे ‘ईडी’ वगैरेचा ससेमिरा लागलेला आहे. हे लोक त्यांच्या घराघरात घुसतात, तसे कुण्या भाजपवाल्यांच्या घरात घुसल्याचे कधी दिसले नाही.
  2. अलीकडेच जे ‘आयपीएल’चे सामने पार पाडले, त्यात पुढे व मागे जे आर्थिक व्यवहार पार पडले, त्यात मोठय़ा उलाढालीमागे कोण होते, हा ‘ईडी’सारख्या संस्थांसाठी संशोधनाचा विषय आहे. ज्या डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी ‘नॅशनल हेराल्ड’चे प्रकरण बाहेर काढले, त्याच डॉ. स्वामी यांनी ‘आयपीएल’ सामन्यांतील आर्थिक उलाढालींवरही बोट ठेवले, पण ‘नॅशनल हेराल्ड’ला एक न्याय लावायचा व ‘आयपीएल’सारख्या प्रकरणांकडे पाहायचे नाही, असे सुरू आहे. त्यामुळे ‘कायद्यापुढे सर्व समान आहेत’ हे तत्त्व आपल्या देशात मरून पडले आहे.
  3. ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात पी. चिदंबरम यांनी ‘ईडी’ला काही सरळ प्रश्न विचारले आहेत. ”पीएमएलए’अंतर्गत राहुल गांधी यांनी कोणता अनुसूचित अपराध (schedule crime) केला? कोणत्या पोलीस एजन्सीने ‘अनुसूचित अपराधा’संदर्भात एफआयआर दाखल केला आहे?” चिदंबरम यांनी विचारलेले हे दोन्ही प्रश्न धारदार आहेत, पण या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे ‘ईडी’जवळ नाहीत. त्यांना वरून सांगण्यात आले, राहुल गांधींना लक्ष्य करा, सोडू नका. त्यांनी हुकमाची अंमलबजावणी केली. त्यांना वरून आदेश आले.
  4. अनिल देशमुख, नवाब मलिक, अनिल परब, संजय राऊत, लालू यादव, अखिलेश यादव, अभिषेक बॅनर्जी यांना ‘गुंतवा.’ ‘ईडी’ने फक्त ‘मम’ म्हटले. त्यामुळे या देशात ‘समान न्याय’ हे एक थोतांड बनले आहे. ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात चिदंबरम यांनी ‘एफआयआर’ची कॉपी मागितली, पण ‘ईडी’ ती कॉपी देऊ शकली नाही. कोणताही अनुसूचित अपराध नाही, एफआयआर नाही, तरीही ‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी ‘ईडी’ने तपास सुरू केला व राहुल गांधी यांना कार्यालयात बोलावून घेतले. हे सर्व बेकायदेशीर आहे.
  5. भाजपला पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या स्मृती फक्त नष्टच करायच्या नाहीत, तर त्या परिवाराची वंशवेलही कायमची संपवून टाकायची आहे. या देशात नेहरू-गांधी नावाचे काही शिल्लक ठेवायचे नाही, असा विडा उचलूनच राष्ट्रीय कार्याची दिशा ठरवली गेली आहे. हे सूडाचे राजकारण आहे. सत्ता ही विनयाने वापरायची असते, राष्ट्रकल्याणासाठी तिचा अंमल करायचा असतो. राजकीय लढाया निवडणुकीच्या आखाडय़ात लढायच्या असतात. हीच या देशाची परंपरा आहे.