मंत्रिपदाची संधी हुकली, आता भावना गवळींना लोकसभेचं उपाध्यक्षपद मिळणार?

लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने घवघवीत यश मिळवलं. त्यानंतर 30 मे रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची, तर त्यांच्या 57 सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

  • दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 8:25 AM, 6 Jun 2019
मंत्रिपदाची संधी हुकली, आता भावना गवळींना लोकसभेचं उपाध्यक्षपद मिळणार?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने घवघवीत यश मिळवलं. त्यानंतर 30 मे रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची, तर त्यांच्या 57 सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये 18 खासदार असलेल्या शिवसेनेला अवघं एक मंत्रिपद मिळालं आणि तेही ‘अवजड’. त्यामुळे खासदार संख्येनुसार मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेना नाराज आहे. शिवसेनेची ही नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेच्या ज्येष्ठ खासदार भावना गवळी यांना लोकसभेचं उपाध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे.

भावना गवळी या शिवसेनेच्या ज्येष्ठ खासदार आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून तीनवेळा, तर वाशिम लोकसभा मतदारसंघातून दोनवेळा खासदार झाल्या आहेत. सध्या सलग पाचव्यांदा लोकसभेत शिवसेनेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भावना गवळी यांना यंदा मंत्रिपद मिळण्याची आशा होती. मात्र, शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या एकमेव मंत्रिपदाची माळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्या गळ्यात टाकली.

शिवसेनेचे खासदारांमध्ये वरिष्ठ असूनही आणि सलग पाचव्यांदा जिंकूनही मंत्रिपद न मिळाल्याने भावना गवळी नाराज होत्या. मात्र, मंत्रिपदाची संधी हुकलेल्या खासदार भावना गवळी यांना आता लोकसभेचं उपाध्यक्षपद मिळण्याची दाट शक्यता आहे. भावना गवळींना हे पद मिळाल्यास, त्या लोकसभेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष ठरतील.

खासदारसंख्या पाहता लोकसभेचं अध्यक्षपद भाजपकडे राहील. त्यामुळे लोकसभा उपाध्यक्षपदावर शिवसेनेने दावा केला आहे. किंबहुना, लोकसभेच्या उपाध्यक्ष पदासाछी शिवसेनेने भाजपकडे आग्रही मागणी केली आहे. तसेच, पुढील मंत्रिमंडळ विस्तारात खाते बदलून द्यावे आणि संख्याबळाच्या प्रमाणात मंत्रिपदे द्यावीत, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.

दरम्यान, लोकसभेचं उपाध्यक्षपद शिवसेनेला मिळाल्यास, त्या ठिकाणी यवतमाळ वाशिमच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना दिले जाईल आणि त्यांची नाराजी दूर केली जाण्याची शक्यता आहे.